Type to search

Featured maharashtra देश विदेश नाशिक मुख्य बातम्या राजकीय

कुलभूषण जाधवांच्यावेळी 56 इंचाची छाती 12 इंच कशी होते? – शरद पवार यांचा सवाल

Share

कोपरगाव येथे आघाडीची सभा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – पुलवामच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. याप्रश्‍नी आपण सरकारच्या बरोबर राहिलो. हल्ल्याचे राजकारण कधी केले नाही. अभिनंदन याची सुटका जिनिव्हा येथे झालेल्या करारामुळे झाली. मात्र देशाचे पंतप्रधान म्हणतात की, माझ्या 56 इंचाच्या छातीमुळे अभिनंदनची सुटका झाली असे म्हणणार्‍या पंतप्रधानांची छाती पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्यावेळी 12 इंचाची का होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री शरद पवार यांनी केला आहे.

कोपरगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ विजय निर्धार मेळाव्याचेे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ.अशोक काळे, आशुतोष काळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार वैभव पिचड, विनायक देशमुख,  अरुण कडू, नगरसेविका माधवी वाकचौरे, प्रतिभा शिलेदार, सचिन गुजर, रावसाहेब म्हस्के, पद्माकांत कुदळे, संदीप पगारे, जिल्हाध्यक्ष करण ससाणे, अविनाश आदिक, एकनाथ घोगरे, अशोक खांबेकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब गायकवाड, सभापती अनुसया होन, मंदार पहाडे, सचिन रोहमारे, माधवराव खिलारी, दिलीप शिंदे, दीपक साळुंके, रावसाहेब साठे, राजेंद्र आभाळे, नवाज कुरेशी, संदीप वर्पे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, कोपरगाव तालुक्याचे राजकारण फार वेगळे आहे. इथे आता इतके रस्ते झाले आहेत की, कोण कोणत्या रस्त्याने जातो हे कळायला तयार नाही. शंकरराव काळे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांनी चांगली काम केली. तसेच महाराष्ट्रात सर्वात मोठी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा जिल्हा आणि तालुका कोपरगाव आहे.

या अगोदर देशातील अनेक निवडणुकांना मी सामोरे गेलो. मात्र एकाला मतदान केलं आणि मत दुसर्‍याला गेलं, असे कधी झाले नाही. तुमचं मत ज्यांना द्यायचं त्यांना द्या. मात्र त्यालाही गेलं की नाही ती खात्री करा. ज्या देशात एका कुटुंबातील दोन कर्तृत्ववान लोकांनी आपले प्राण देश हितासाठी गमावले त्यांच्यावर पंतप्रधान टीका करतात.

माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की, भाजप सरकारने 66 निकष लावून दिलेली कर्ज माफी ही निव्वळ फसवी आहे. आशुतोष काळे म्हणाले की, पाच वर्षात विद्यमान खासदाराने कोपरगावात पाऊल ठेवलं नाही. शहरातील अत्यंत ज्वलंत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी व खासदारांनी राजकारण केले. केवळ माजी आमदार अशोक काळे यांना कामाचे श्रेय मिळू नये म्हणून कामे होऊ दिली जात नाहीत. सूत्रसंचालनासह आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंके यांनी मानले.

कांबळेंना लोकसभेत पाठवा – 
गेल्या 28 वर्षांपासून मी संसदेत आहे. देशातील सगळे खासदार मला ओळखतात. मी ही त्यांना नावानिशी ओळखतो. मात्र शिर्डी लोकसभेचे खासदार एकदाही विकासात्मक प्रश्नावर अथवा चर्चेत बोलताना दिसले नाही. जे खासदार मलाच दिसले नाही ते सर्व सामान्यांना कधी दिसणार? उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांचे विधानसभेतील काम चांगले आहे. लोकसभा मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी त्यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

मोदी सरकारची हवा गेली –
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मोदी सरकारची हवा गेली आहे. गत पाचवर्षामध्ये विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरलेल्या या सरकारला आता खाली खेचण्याची वेळ आली आहे. जिथे नितीन गडकरींसारखा माणूस अडचणीत आहे तर इतर सर्वांची काय अवस्था असेल हे वेगळे सांगायला नको. खासदार लोखंडे हे नेमके चेंबूरला राहतात की चेंबरला हेच कळत नाही. निळवंडेसाठी एक रुपयाचाही निधी प्रत्यक्षात न आणता ते निधी आणल्याचा कांगावा करतात, असे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!