राष्ट्रवादी केव्हाही निवडणुकीला तयार; सेना-भाजपा म्हणजे काळूबाळूचा तमाशा

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत नेत्यांची सरकारवर टिका

0

नाशिक (अमोल यादव/मनीष कटारिया) ता. १५ : मुदतपूर्व किंवा मुदतीत राज्यात निवडणूका झाल्यास राष्ट्रवादी केव्हाही तयार आहे, असे स्पष्ट करून सांगतानाच गद्दार कार्यकर्त्यांची पक्षात गय केली जाणार नाही असा इशाराही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील आढावा बैठकीत नेत्यांनी दिला.

सेना-भाजपा म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे, एक रडल्यासारखे करतो, दुसरा मारल्यासारखे करतो. मुदतपूर्व निवडणूका होणार नाही, ते फक्त नाटक आहे, अशी कडक शब्दांत आ. अजित पवार यांनी भाजपा सेनेवर टिका केली.

अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील आढावा बैठकीत भारतीय जनता पार्टी आणि भाजपा प्रणीत सरकारला टिकेचे लक्ष्य करण्यात आले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीतील मतभेदही चव्हाट्यावर आले.

मात्र कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे. सोशल मीडियाचा वापर करावा. जो काम करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल असा इशारा याच बैठकीत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिला.

तर पक्ष सर्वांचा आहे, कुणाच्या घरचे लग्न नाही. आपसातील कुरघोड्यांमुळे पक्षाला फटका बसत आहे. होर्डिंगवर फोटो नाही म्हणून नाराज होऊ नका. प्रामाणिकपणे काम करा. तसेच पक्षाशी गद्दारी केल्यास घरचा रस्ता दाखविण्यात येईल, असा इशारा आ. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आज दुपारी पक्षाचे नेते आ. अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. कार्यकर्त्यांची बैठक प्रारंभ झाली तेव्हा व्यासपीठावर पवार, तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते हेमंत टकले, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, स्मिता पाटील, संग्राम कोते पाटील उपस्थित होते.

या बैठकीतील नेत्यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे

माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार

 • कर्जमाफीसाठी मुंबई मनपाकडून ६० हजार कोटी घ्या.
 • सरकार तुमचे आहे, माझी केव्हाही खुशाल चौकशी करा.
 • अक्कल वापरून जी.आर. काढा.
 • सरकार अल्पसंख्यकांच्या विरोधात.
 • साहेब (शरद पवार) असताना साखर निर्यात होत होती. आज आयात केली जाते.
 • सरपंच जनतेतून निवडल्याने सावळा गोधळ होणार.
 • संघर्ष यात्रेमुळे कर्जमाफीचे वातावरण निर्माण झाले.
 • युती मुळे शेतकरी संपावर, कर्जमाफी फसवी आहे.
 • कर्जमाफीची तारीख पे तारीख सुरू आहे.
 • सरकारच्या अभ्यासचर्चांना ऊत आला आहे.
 • मोदींची हवा ओसरत चालली आहे. मनसेचे इंजिन भरकटले आहे.
 • सत्तेत असताना पक्षाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.
 • माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर साहेबांजवळ करा, पण प्रामाणिकपणे काम करा.
 • आपसातील कुरघोड्यांमुळे पक्षाला फटका
 • पक्ष सर्वांचा आहे, कुणाच्या घरचे लग्न नाही.
 • होर्डिंगवर फोटो नाही म्हणून नाराज होऊ नका.
 • उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांना वेळीच ओळखा.
 • पक्षात सर्वांना स्थान द्या.
 • दोन महिन्यात कार्यकारिणी तयार करा. पहिले आपले घर सांभाळा, मग बाहेर पडा.
 • पक्षाशी गद्दारी केली, तर घरचा रस्ता दाखविण्यात येईल.
 • दोन महिन्यात कामगिरी सुधारा नाहीतर घरी जा.
 • तरुणांना संधी द्या. सभेला येणाऱ्यांची हजेरी घ्या, गैरहजरांची नोंद ठेवा.
 • पक्षातून गेलेल्यांना परत घ्या, पण पद देऊ नका.

प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे

 • मुदतपूर्व किंवा मुदतीत निवडणुका होऊ द्या. राष्ट्रवादी तयार आहे.
 • जनतेला फसविण्यात भाजपा यशस्वी
 • या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली.
 • अजितदादांकडे गेल्यावर प्रश्न सुटतात असा समज अजूनही जनतेत आहे
 • शरद पवारांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणार
 • समृद्धीबाबत सेनेची दुटप्पी भूमिका. एकीकडे विरोध, दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यावर सह्या करतात.
 • कर्जमाफीची मागणी सर्वात आधी राष्ट्रवादीने केली होती.
 • शिवसेना सभागृहातील निर्णयात सामिल होऊन बाहेर विरोधाचे नाटक करते.
 • २०० आमदार असूनही राज्यातील युती सरकार कमकुवत आहे.
 • शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे कुठे गेले?
 • गोरक्षकांमुळे आज अल्पसंख्यकांना असुरक्षितता वाटू लागली आहे.
 • कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे.
 • जुलैतील राजकीय भूकंपाचे काय झाले?
 • कार्यकर्त्यांनी मतभेद विसरावे
 • सोशल मीडियाचा कार्यकर्त्यांनी वापर करा.
 • पक्षाचे काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता

दरम्यान महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, नगरसेवक व ज्येष्ठ नेते गजानन शेलार यांनीही आपले मनोगत मांडले.

LEAVE A REPLY

*