Type to search

Featured सार्वमत

श्रीरामपुरात नवरात्रोत्सवावर बहिष्कार

Share

जागेच्या प्रश्‍नाबाबत प्रशासनाचा निर्णय अमान्य

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सव जागेच्या प्रश्‍नाबाबत पोलीस प्रशासनाचा निर्णय मान्य नसल्याने शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांनी यंदाच्या नवरात्रोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. काल रेल्वे स्टेशन हनुमान मंदिरात शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांनी जागेच्या प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यासाठी स्वामी विवेकानंद मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मनसेचे बाबा शिंदे, जिजामाता तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय छल्लारे, अशोक उपाध्ये, सिध्दार्थ मुरकुटे, नगरसेवक दीपक चव्हाण, कुणाल करंडे, अतुल वढणे, विजय जैस्वाल, भीमा बागुल, महेंद्र साळवी, राजेंद्र देवकर, संजय यादव, सतीश सौदागर, मनोज हिवराळे, प्रशांत शितोळे, बिट्टू कक्कड, विलास सासे, अहमद टेलर यांच्यासह शहरातील नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकाश चित्ते म्हणाले, शहरात नवरात्र उत्सव साजरी करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा असून हे उत्सव हिंदूंच्या अखंडतेचे रक्षण करणारे आहे. आतापर्यंत हे सण साजरे करताना कधी राजकारण आडवे आले नाही. पोलीस प्रशासनाने याबाबत तोडगा काढण्यासाठी 28 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. उत्सव थोड्या दिवसावर आल्याने आता कुठलीही तयारी होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत झालेला निर्णय अंतिम राहिल. तसेच उत्सव साजरा केला नाही तरी नऊ दिवस भजन, जागरण गोंधळ असे कार्यक्रम घेऊन निषेध नोंदविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

राजेंद्र सोनवणे म्हणाले, गणेश उत्सवातही मंडप उभारण्याबाबत जागेच्या प्रश्‍नावरच मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे शहरात गणेश उत्सव साजरे झाले की नाही, असेच जाणवत होते. नवरात्र उत्सवातही तोच प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. त्यामुळे या नवरात्रौत्सवावर बहिष्कार टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला. संजय छल्लारे म्हणाले, मागील 30 वर्षापासून उत्सव साजरे करीत आहोत. मात्र आतापर्यंत परवानगीबाबत अडचण आली नाही. मग आताच ही अडचण का आली. आता श्रीरामपुरात दुसरे काही राहिलेले नाही. शहरात सेटलमेंट करणारे खूप लोक आहे. मात्र आजच्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्व मंडळांनी मान्य करावा, आणि तोच निर्णय अंतिम राहिल. तर भविष्यात श्रीरामपुरातील श्रीरामनवमी उत्सवावरही गदा आल्याशिवाय राहणार नाही, असे भाकित श्री छल्लारे यांनी बोलून दाखविले.

या उत्सवावर सर्वांनी बहिष्कार टाकून एकी दाखवावी, त्यामुळे प्रशासनावर दबाव येईल. व कुणीही उत्सव साजरा करु नये, असे अशोक उपाध्ये म्हणाले. यावेळी अतुल वढणे, कुणाल करंडे, बाबा शिंदे, दत्तात्रय साबळे यांनीही पालिका व पोलीस प्रशासनाचा निषेध करत नवरात्र उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयास सहमती दर्शविली. यावेळी जय श्रीराम गु्रप, जागृती मित्रमंडळ यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बैठक संपल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी थत्ते मैदान येथे जावून याठिकाणी नवरात्र उत्सव काळात भरविण्यात येणार्‍या श्रीरामपूर महोत्सवाचे संयोजकांची भेट घेवून हा महोत्सव रद्द करण्याची विनंती केली. तसेच दांडिया स्पर्धेच्या आयोजकांचीही भेट घेऊन या बहिष्कारामध्ये सहभागी होण्याची विनंती केली.

प्रकाश चित्ते म्हणाले, शहरात नवरात्र उत्सव साजरी करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा असून हे उत्सव हिंदूंच्या अखंडतेचे रक्षण करणारे आहे. आतापर्यंत हे सण साजरे करताना कधी राजकारण आडवे आले नाही. पोलीस प्रशासनाने याबाबत तोडगा काढण्यासाठी 28 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडून याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. उत्सव थोड्या दिवसावर आल्याने आता कुठलीही तयारी होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत झालेला निर्णय अंतिम राहिल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!