जगदंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0
समशेरपूर ( वार्ताहर) – असंख्य भाविकांचे कुलदैवत, श्रद्धास्थान, नवसाला पावणारी, जागृत स्वयंभू, असलेल्या श्रीक्ष्रेत्र टाहाकारी (ता.अकोले) येथील जगदंबामातेच्या दर्शनास भाविकांची गर्दी होत आहे.
सुंदर बहरलेला निसर्ग, डोंगर रांगातून वाहत येणार्‍या पवित्र आढळा माईच्या जलाशयात पाय रोऊन, अनादी काळापासून विराजमान असलेले, शिल्पांकित हेमाडपंथी घाटणीचे मंदीर, मंदीर व परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईचा लखलखाट, त्यात आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर, जगदंबामातेचा जयघोष व भाविकांची गर्दी यामुळे टाहाकारी गाव परिसर जगदंबमय होऊन, नवरात्र महोत्सव आनंदमय झाला आहे.
लाखो भाविकांनी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. भाविकांनी शांततेत दर्शन घेवून सहकार्य करावे असे आवाहन अंबाई देवस्थान संस्था व टाहाकारी ग्रामस्थांनी केले आहे. अकोले तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर हे 13 व्या शतकातील हेमाडपंती घाटणीचे प्राचीन, शिल्पांकित दुर्मिळ ठेवा असलेले मंदीर आहे. यामुळे येथे भाविक, सौंदर्योपासक व इतिहास कला प्रेमी नवरात्र महोत्सवात गर्दी करतात.
महोत्सवास दीपक महाराज एखंडे यांच्या हस्ते देवी पूजन होऊन प्रारंभ झाला व सोमवार दि. 2 आक्टोबरला देवगोपाल महाराज शास्री (जळगाव) यांचे कीर्तन होणार आहे. विजयादशमीला महाप्रसादाचे वाटप व कार्यक्रमाची सांगता होेणार आहे.
मंदिर व मातेविषयी भाविक अनेक पौराणिक कथा सांगतात. मंदिर परिसर दंडकारण्य म्हणून सर्वश्रुत आहे. रावणाने सितेचे अपहरण केले असता सीता टाहो फोडून रडली म्हणून या गावास टाहाकारी असे नाव पडले. सर्व शक्तीशाली माता असल्याने या गावात हनुमान मंदिर नाही. गाव क्षेत्रात महिला नृत्य चालत नाही. देवीच्या पूजेचा मान गिरी कुटुंबास आहे.
देवीचे मंदिर शिल्पकलेचा अव्दितीय, दुर्मिळ प्राचीन ठेवा असून संरक्षणासाठी पुरातन वास्तू विभाग, औरंगाबाद यांच्या ताब्यात आहे. तर देवीच्या धार्मिक विधींचा हक्क ग्रामस्थांना आहे. मंदिराचे बांधकाम शिल्पांकित आहे. स्तंभ, मंडप, प्रवेशद्वार, छत, गाभारा, आतील व बाहेरील भींती विविध विषयांनी शिल्पाकिंत आहेत.
भौगोलिक व अंलकारीक रचने बरोबर विविध देवदेवता, दंतकथा, पौराणिक विषय, प्रणय क्रीडा असे विषय जिंवत साकारले आहेत. त्यात बोधीसत्व पद्मपाणी, नटेश्वेर, सुडौल ललना, भद्रकाली माता, माता लक्ष्मी, प्रणयक्रीडा करणारी शिल्पे चित्त वेधून घेतात. शिल्पांकित कला पाहण्यासाठी दूरवरून भाविक गर्दी करतात. जगदंबा मातेस रोज वाजत गाजत भक्तिभावाने पुष्पमाला चढविली जाते. चढत्या माळेबरोबर गर्दी वाढत जाते.
भाविक दर्शन घेऊन कृपा आशीर्वाद घेतात तर नवस पूर्ती करतात तर काही नवस बोलून मातकडे साकडे टाकतात. नवरात्रात देवीला नारळ फोडला जात नाही. कारण नारळ गणेशरुप असल्याने त्याने ओटी भरतात. हिरवी साडी चोळी चुडा लेऊन, कपाळी मळवट भरुन, हळदी कुंकू वाहून, दागदागिने चढवून देवीची पुजा बांधून भाविक आशीर्वाद घेतात. 7 व्या 9 व्या माळेस खूप गर्दी होते व विजयादशमीला महासांगता उत्सव होतो.
यंदा पाऊस भरपूर झाल्याने भाविकांची अलोट गर्दी होत आहे. हा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थान अध्यक्ष भाऊसाहेब एखंडे, सचिव देवीदास केदार, बच्छाव एखंडे, आदिनाथ एखंडे, गौतम एखंडे, विवेक केदार, केरू एखंडे, अण्णासाहेब एखंडे, नाना एखंडे, अशोक एखंडे, दशरथ एखंडे, देवीदास केदार, रावसाहेब एखंडे, बन्सी उगले, बाळासाहेब एखंडे, रामनाथ केदार, वसंत एखंडे, संतोष एखंडे, प्रकाश एखंडे, ज्ञानदेव एखंडे, बाळचंद एखंडे, तुकाराम उगले व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

 

LEAVE A REPLY

*