नवरात्रोत्सव : मायगावदेवी येथील अंबाबाई माता

0

मायगाव देवी येथील अंबाबाई माता मंदिरात नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे.
दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीकाठी जागृत अंबाबाई मातेचे देवस्थान आहे.

पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभलेले हे देवस्थान अहमदनगर, नाशिक, बीड, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द देवस्थान असुन हे हजारो श्रध्दाळू शक्ती उपासकांचे आराध्य देवस्थान आहे.
अंबाबाई माता माहुर गडावरच्या आपल्या बहिणीला रेणुका मातेला भेटून येवला तालुक्यातील मुखेडला काही काळ विश्रांती घेवून मायगाव देवी येथे आली. मात्र तिचे वाहन असलेले बैल मायगावातचं मरण पावल्याने अंबाबाई माता मायगाव येथेच गोदावरी नदीच्यातीरी स्थानापन्न झाली. अशी अख्यायिका सांगितली जाते.
आंबामातेचे मंदिर इ.स. 13 व्या शतकात स्थापन झाले असावे असा अंदाज आहे. देवीच्या तांदळ्यामध्ये वरील भाग माता रेणूकाचा असुन पोटाचा भाग भगवान परशूरामाचा आहे असे सांगितले जाते. दहाबारा वर्षांपूर्वी सुमारे 30 लाख रुपये खर्च करुन मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे.
या देवस्थानाचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झालेला असुन पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. चैत्र शुध्द पौर्णिमेला अंबाबाई मातेचा यात्रौत्सव 10 ते 15 दिवस चालतो. आदिशक्ती आंबामातेचा नवरात्रौत्त्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मंदिरात पंचक्रोशीतील भाविक घटस्थापनेपासून विजया दशमीपर्यंत घटी बसतात. नवरात्रौत्सव काळात या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येते. येथे मनोगते पूर्ण होत असल्याने भाविक देवीची श्रध्देने खणानारळाने ओटी भरतात.
नवसाला पावणारी देवी म्हणून या स्थानाचे महत्व सर्वत्र असल्याने भाविक मोठ्या भक्तिभावाने येवून आपली नवसपुर्ती करतात.
दिवसेंदिवस येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व देवस्थानाचा नावलौकिक होत असुन पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.

LEAVE A REPLY

*