Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमल्लखांबावर जेव्हा नवदुर्गा अवतरते...!

मल्लखांबावर जेव्हा नवदुर्गा अवतरते…!

नाशिक । Nashik

यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने नवरात्री निमीत्त देवीच्या शक्तीची उपासना आणि व्यायाम आणि खेळाची सांगड घालत मल्लखांबद्वारे नवदुर्गा साकारण्यात आल्या.

- Advertisement -

नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या नऊ देवींच्या रूपांची वैशिष्ट्य आणि मल्लखांब खेळ आणि या खेळामुळे होणारे फायदे याची सांगड घालण्याचा प्रयत्न यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने करण्यात आला.

यशवंत व्यायाम शाळा मल्लखांब विभागाचे प्रशिक्षक यशवंत जाधव, उत्तरा खानापुरे, तनया गायधनी, पंकज कडलग, ऋषिकेश ठाकूर अक्षय खानापुरे यांच्या संकल्पनेतून व नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने व्यायामाचे आणि खेळाचे महत्त्व याची सांगड घालत नवरात्राच्या नऊ दिवसाचे महत्व असलेल्या वेषामध्ये यशवंत व्यायाम शाळेच्या मलखांबपटू आणि प्रशिक्षक यांनी आसनाच्या द्वारे सादरीकरण केले आहे.

याबाबत जाधव यांनी सांगीतले, मल्लखांब मुळे आपल्याला निरोगी व दर्जेदार जीवन, सहनशक्ती, इच्छाशक्ती, आत्मनिर्भरता, आत्मिक सौंदर्य, स्वतःकडे बघायचा दृष्टीकोण, धैर्य, प्रेमळता, आत्मविश्वास, सकारात्मकता, एकाग्रता व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होण्यास मदत होते. आजच्या काळामध्ये व्यायामाचे महत्त्व अमुलाग्र आहे. त्यासाठी उपासनेच्या शक्ती बरोबरच शक्तीची उपासना करणे तेवढेच आवश्यक झाले आहे. या नऊ देवींच्या विविध गुणांमधुन व मल्लखांबाच्या सरावामधून आपण व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ज्या उत्साहाने आपण नवरात्री साजरी करतो त्याच उत्साहाने व्यायाम केला तर दुहेरी फायदा होऊ शकतो.

आजच्या काळामध्ये महिलांचे स्वतःच्या शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देणे होत नाही. याच कारणामुळे त्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे महिलांनी अगदी लहान वयापासून ते तरुण वयात आणि त्यानंतरही प्रौढ वयातही नियमित व्यायाम आणि आपल्या वयानुसार मल्लखांबाचा सराव केल्यास महिलांना त्यांच्या पाल्यांच्या स्वास्थ्यासोबत स्वतःचेही स्वास्थ्य जपता येईल.

वयानुसार येणार्‍या काही व्याधींना टाळता येईल. हे सर्व लक्षात घेऊन या दसर्‍यानिमित्त आपण व्यायामाला सुरुवात करत निरोगी व सुदृढ आरोग्याचा आप संकल्प करूया. यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या या उपक्रमासाठी यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दिपक पाटील आणि सर्व कार्यकारी मंडळाचे सहकार्य लाभले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या