उद्योगास अवकाश मोठे.. नारी घे भरारी! नगर टाइम्सतर्फे नारीशक्तीचा सन्मान

0

नवदुर्गाची उद्यमशील महिलांना हाक 

अहमदगर : नगर शहर खेडेगाव म्हणून हिणवले जात असले तरी इथे उद्योगासाठी प्रचंड मोठा स्पेस आहे. महिलांसाठी हे मोठे अवकाश खुणावते आहे. आपल्याभोवतीच्या भिंती ओलांडून तिने झेप घेत गगनभरारी घ्यावी. शहरातील नवउद्यमशील महिलांच्या पंखांना आम्ही बळ देऊ… असे अभिवचन नगर शहरातील उद्योग, व्यापार, बँकिंग, वैद्यकीय, साहित्य क्षेत्रातील नवदुर्गांनी दिले.
नगर टाइम्सने नवरात्रौत्सवात समाजातील व्यापार, उद्योग, साहित्य, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या महिलांचा संघर्ष समाजातील इतर घटकांना प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने नवदुर्गा या सदरातून समाजासमोर आणला. या सदरात उद्योग, तसेच गॅलेक्सीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या उषाताई देशमुख, शिक्षण क्षेत्रातील छायाताई फिरोदिया, महिलांसाठी बँक उभारणार्‍या प्रा. मेधाताई काळे, सामाजिक क्षेत्रातील डॉ. सुधाताई कांकरिया, बेकरी व्यवसायातील दीपाताई चंदे, मस्तानी सौफ देशभरात नेणार्‍या मधुबाला चोरडिया, कोहीनूर परिवार आणि निनाज डिझाईन स्टुडिओच्या श्‍वेता गांधी, ज्वेलरी क्षेत्रातील श्रद्धा बिहाणी, क्रीडा क्षेत्रात खो-खोमधील वीरबाला श्‍वेता गवळी यांचा जीवनपट मांडण्यात आला.
समाजाच्या विविध घटकांतील वाचकांकडून त्यांच्या या प्रेरणादायी संघर्षाला प्रचंड दाद मिळाली. पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची दखल समाजाला घ्यायला लावली. ज्यांना समृद्ध वारसा आहे अशा महिलांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध केलं. त्यांच्या या कर्तृत्वाचा नगर टाइम्स परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, सरव्यवस्थापक हरी यादव, वृत्तसंपादक बद्रिनारायण वढणे, नगर टाईम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे, उपसंपादक अशोक निंबाळकर यांनी त्यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. त्यावेळी या नवदुर्गांनी सामाजिक बांधिलकीतून नगर शहरासाठी काम करण्याचे अभिवचन दिले.
सत्कार सोहळ्यानंतर संपादकीय विभागाने नगर शहरातील उद्योगातील वाव आणि आव्हाने या विषयांवर त्यांच्या संवाद साधला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत, मीना भंडारी आदी उपस्थित होते. या संवादसत्रात या नवदुर्गांनी दिलखुलासपणे उत्तरे देत शहरातील होतकरू महिलांसाठी काम करण्यासाठी तयारी दर्शवली. एवढेच नव्हे तर त्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासही वेळ देऊ. नगर शहराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. इथला ग्राहक चोखंदळ आहे. त्यालाही फॅशन कळते. मात्र, तो पुण्या-मुंबईतील मॉलमध्ये जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी नगरमध्ये पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. कमी किंमतीत चांगल्या वस्तू मिळाल्या पाहिजेत, अशा मानसिकतेचा इथला ग्राहक आहे, असे निरीक्षण निनाजच्या श्‍वेता गांधी यांनी नोंदवलं. प्रत्येक महिलांच्या जीवनात हा संघर्ष असतोच. कधी तो कौटुंबिक पातळीवर असतो तर कधी वैचारिक पातळीवर. संघर्षाविना कोणत्याच व्यक्तीला काहीच साध्य होत नाही. त्यामुळे विपरित परिस्थितीचा बाऊ केला जाऊ नये. लोकांनी उगाच आपल्याला बिचारं करू नये, असे मत या तरूण उद्योजिका श्रद्धा बिहाणी यांनी मांडलं.
महिलांनी घर सोडून बाहेर पडलं की, सगळं अवकाश तिच्यासाठी खुलं होतं. परंतु उंबरा ओलांडण्याचा पहिला अडथळा तिने आपल्या हिंमतीवर दूर केला पाहिजे. कधी रूढी, परंपरा, प्रतिष्ठा अशा न्यून गोष्टी तुम्हाला मागे खेचतात. आपण स्वतः खंबीर असलो तर संकटं बाहेरच्या बाहेर पळून जातात. सर्वच क्षेत्रात महिला दिसत असल्या तरी बरीच क्षेत्र पादाक्रांत करायची बाकी आहेत, अशी भावना उषाताई देशमुख यांनी व्यक्त केली.
महिला आर्थिक सक्षम नसल्याने दुबळ्या गणल्या जातात. ती खरीखुरी लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती असताना अबलेचे जीवन जगते. त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी महिला बँक चांगला पर्याय आहे. उद्योग व्यवसाय सुरू करायचा असल्यास अंबिका बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मात्र, बहुतांशी महिला या पती, मुलगा यांच्यावर अवलंबून असतात. ही परीस्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षा मेधाताई काळे यांनी व्यक्त केली. अनेक महिलांची स्वप्ने ही छोटी-छोटी असतात. मात्र, आपल्या स्वप्नेच मोठी केली पाहिजेत. आपण एकदा का कामाला सुरूवात केली की सगळी परिस्थिती तुमच्या बाजूने झुकते. सातत्याने वाट शोधत राहिली तर ती नक्की सापडते, असे मस्तानी सौफच्या मधुबाला चोरडिया यांनी सांगितलं.

हस्तक्षेप रोखायला हवा हस्तक्षेप रोखायला हवा नगरचे मार्केट मोठं आहे. परजिल्ह्यातील लोकही इथे खरेदीसाठी येतात. भविष्यात ते वाढतच जाणार आहे. मात्र, काही बाबतीत इथे हस्तक्षेप केला जातो. तो बाजारासाठी हानीकारक आहे. उद्योगाला एकवेळ सुविधा नाही मिळाल्या तरी चालतं. परंतु प्रत्येक गोष्टीत लुडबुड केली जाते. परिणामी त्या उद्योजकाची उमेद संपते. हे वेळीच रोखलं पाहिजे. व्यापारपेठ वाढीतील अडथळेही या महिलांनी निदर्शनास आणून दिले.

घरालाही महत्त्व हवे :  हल्ली समाजात करिअरच्या मागे धावणार्‍या अनेक स्त्रीया आहेत. मात्र, घर आणि करिअर हे दोन्ही सांभाळता आले पाहिजे. दोन्ही पातळीवर अंतर जिच्या लक्षात येते. तीच स्त्री यशस्वी उद्योजिका होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना समाधानी ठेवणार्‍या महिलेला अडचणीच येत नाहीत, असेही निरीक्षण नवदुर्गांनी नोंदवले.

महिला आजही अबलेचे जीवन जगतात. बँकांचे सर्व व्यवहार त्यांच्या घरातील पुरूष मंडळीच पाहतात. गृहोद्योगासाठी कर्ज मागणार्‍या महिला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत.
– मेधाताई काळे, संस्थापक, अंबिका बँक

 

 

जीवनात कोणतीच गोष्ट कठीण नसते. आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेताना कमीपणा वाटता कामा नये. महिलांना घरातूनही प्रोत्साहन मिळाले पाहिजे
– मीनाताई मुनोत, ज्येष्ठ पत्रकार, उद्योजिका

 

 

महिला उद्योजिका वाढल्या पाहिजेत. प्रत्येकीत काही तरी कला असते. तिला समाजासमोर आणल्यास स्त्री सक्षम होईल. यासाठी जागृती करणं गरजेचे आहे.
– मधुबाला चोरडिया, मस्तानी मुखवास

 

 

 

ज्या महिलांनी करिअर केलंय, त्यांनी आता समाजातील इतर महिलांच्या उन्नीतीसाठी पुढे आलं पाहिजे. उद्योगच नाही तर कोणत्याही आवडत्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे. तरच महिला सक्षम होतील.
– उषाताई देशमुख, उद्योजक

 

 

 

महिलांच्या अंगी शोषिकता असते. ती काटकसर करून संसार चालवित असते. त्याचा प्रत्यय उद्योग व्यवसायातही येतो. त्यामुळे महिलांचा उद्योग तोट्यात जात नाही.
– डॉ. सुधा कांकरिया, नेत्रतज्ज्ञ, समाजसेविका

 

 

आपण काम करीत राहायचं. दुःख, वेदना, संघर्ष सर्वांनाच असतो. तो इतरांना सांगायचा नाही. यासारखी काही पथ्य पाळली तर महिलांना उद्योगात यश मिळतेच मिळते.
– श्रद्धा बिहाणी, ज्वेलरी डिजाईनर

 

आपल्या क्षेत्रातील प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. मार्केटला काय हवंय, हे माहिती हवं. लोकांच्या अभिरूची तुम्हाला कळल्या तर यश मिळवणं फार अवघड नसतं.
– श्‍वेता गांधी, निनाज डिजाईन स्टुडिओ      

LEAVE A REPLY

*