रेणुकामाता मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज

0

देवळाली कॅम्प (वार्ताहर) :-आजपासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवासाठी देवळाली व भगूर नगरी सज्ज झाली असून रेस्ट कॅम्प रोडवरील जागृत देवस्थान असणार्‍या रेणुका माता मंदिरासह,माळावरची देवी म्हणून महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्रोत्सची तयारी पूर्ण झाली असून आज घटस्थापना करण्यात येणार आहे.

रेस्ट कॅम्प रोडवर असणार्‍या मंदिराची स्थापना पुरातन काळातील असून भृगू ऋषी यांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे. येथील मंदिरासमोर असणारे पाण्याचे बारव त्वचारोगापासून मुक्ती देणारे म्हणून परिचित आहे. रेणुकादेवी मंदिरासमोर मंडपाची उभारणी करण्यात आली.

दर्शन रांगांची सोय व परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात पूजा साहित्यांसह खेळण्याची दुकाने थाटण्यात येत आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या जमिनीवर खेळण्यांच्या दुकाने थाटण्याकरिता जागा भाड्याने देण्यात आली तर मंदिरासमोर कासार यांच्या मालकीच्या जागेत रहाट-पाळणे उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.

यासोबत लामरोड युवक मित्र मंडळाच्या वतीने 51 शक्तिपीठांपैकी गुजरात येथील अंबाजी माता मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने अध्यक्ष रमेश गायकर यांनी दिली आहे. यासोबत देवळालीतील गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर,रविवार बाजार भागातील श्री मरीमाता मंदिर, शितळामाता मंदिर, तरुण मित्र मंडळ, आरती मित्र मंडळ, संसरी गाव आदी ठिकाणीही घटस्थापना आज करण्यात येणार आहे.

यात्रोत्सवासाठी पोलिसांचा फौजफाटा
देवळालीसह परिसरात साजरा होणार्‍या नवरात्रोत्सवासाठी पोलिसांच्या वतीने तयारी करण्यात आली असून रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुकादेवी मंदिर येथे भरणार्‍या यात्रेच्या काळात 5 अधिकारी,21 महिला पुरुष पोलीस कॉन्स्टेबल,60 होमगार्ड असा ताफा तैनात करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांनी दिली.

वाहतूक मार्गात बदल
देवळालीहून भगूरकडे जाणार्‍या रेस्ट कॅम्प रोडवर रेणुकामाता मंदिर असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून सालाबादप्रमाणे नागझिरा नाला ओलांडल्यानंतर लागणार्‍या चंद्रमणी बस थांब्यापासून धोंडीरोड व बार्नस्कूल मार्गे नाका नंबर 2 जवळ भगूर त्रिफुलीपर्यंत निघणार आहे. हाच मार्ग परतीसाठी देखील पहाटे 5 ते सकाळी 11 व दु.4 ते रात्रौ 12 पर्यंत असणार आहे.

LEAVE A REPLY

*