Type to search

Blog : निसर्गाचा मेकओव्हर

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : निसर्गाचा मेकओव्हर

Share

हा काळ निसर्गाच्या मेकओव्हरचा. फक्त वरवरचा नव्हे. अगदी मुळापासुनचा. कात टाकून नव्याने जन्म घेण्याचा. बाळाचा जन्म मिठाई वाटून साजरा होतो. निसर्गात मात्र नवजन्माचंं स्वागत रंग उधळून केलं जातं. निसर्गाची रंगपंचमी सुरु झाली आहे.

आणि आपलं काय चाललंय?
तुम्हाला नाही वाटतं, पुरे झालं
आता घराच्या खिडकीच्या चतकोर तुकड्यातून आभाळ बघणं…

दिवाणखान्यातल्या चौकोनी डब्यातलं किंवा हातातल्या चौकोनी तबकडीमधील कृत्रिम आभाळ आणि आभासी रंग बघत आभासी जगणं…

 

निसर्गाची प्रत्यक्ष अनुभूती न घेता भावनेने ओथंबलेले कोरडे एसएमएस पाठवणं…
ही तर कर्मदरिद्री लक्षणं.

दोस्तांनो हा, वठलेलं झाड पुन्हा बहरण्याचा ऋुतू. वसतांच्या चाहुलीने त्याला देखील नवपालवी फुटते. जिवंतपणा त्याच्या फांद्याफांद्यातून वाहू लागतो. रसरशित पाने उमलून उठतात.

मला सांगा, कोकिळेला कसं कळतं वसंत आल्याचं? कसं समजतं आंब्याला मोहोर फुलल्याचं? कडुनिंबाला कोवळी फुले आल्याचं?

भल्या पहाटे तिला देखील गावंसं वाटतं. साद घालावीशी वाटते. मग आपल्यालाच काय झालंय हो?
आपण तर हाडामांसाची, निसर्गदत्त चेतनाशक्तीने ओतप्रोत भरलेली माणसं.

 

मग आपल्याला कसा जाणवत नाही निसर्गाचा मेकओव्हर? लालभडक बहाव्याने टाकलेला मांडव..पायाखाली जांभळ्या जॅकरंडाने टाकलेला मखमली सडा.. फांद्या गायब करुन केवळ फुलंच उधळणारा गुलमोहोर..उन्हाच्या काहिलीची वर्णी देणारा लालभडक पळस..हे आपल्याला का दिसत नाही?

दोस्तांनो, ही अनुभूती घेणं कोणा एकाची मक्तेदारी नाही. तुम्हाला आम्हालाही शक्य आहे ते. पण त्यासाठी आळस झटकावा लागतो. उबदार पांघरुणाचा मोह सोडावा लागतो. निग्रहाने भल्या पहाटे घराबाहेर पडावं लागतं. बाहेर पडताना मोबाईल हमखास घरी विसरुन जावा लागतो. गाडी बाजूला सारावी लागते. पायी चालावं लागतं. घरापासुन थोडं लांब जावं लागतं.

नशिब आपलं की, अजून तरी निसर्ग आपल्याला सोडून दूर जंगलात निघून गेलेला नाही. नजरेला सुखावणारी हिरवाई बघण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

 

एकदा रुटीन ब्रेक करुन तर पहा.
जरा उठा आणि बाहेर पडा. बघा निसर्ग खराखुरा बदलतो आहे. बदलाचा पदरव कधीच सुरु झाला आहे. नवपालवीचा उग्र गंध नाकाला झोंबायला लागला आहे.

जुने जाऊ द्या मरणालागुनी असे म्हणणार्‍या कविकल्पनेप्रमाणे जीर्ण पानं वार्‍याच्या मंद लहरीबरोबर पुढच्या प्रवासाला निघाली आहेत. मागे उरले आहेत फांद्यांना फुटलेले कोवळे कोंब. झाडांनी जणू नवपालवीच्या पोपटी रंगाची शाल पांघरली आहे. वसंताने निष्पर्ण झाडात प्राण फुंकले आहेत. वठलेले वृक्ष तरुण झाले आहेत.

 

हा तर नवोन्मेषाचा उत्सव.
दोस्तांनो, हे लोभस रुपडं फार काळ टिकणारं नाही. वसंत आला म्हणता म्हणता तो जाईल सुद्धा. मग उरेल तो ग्रीष्म. जीवाची तगमग करणारा. तेव्हा वसंताचं दर्शन घेण्यासाठी आत्ताच बाहेर पडायला हवं. त्यासाठी भली पहाट (आळशांसाठी हीच वेळ रम्य सायंकाळ) हीच योग्य वेळ. हवेत सुखद गारवा असतो.

कोकिळेची भुपाळी सुरु असते. साथीला पक्षांची किलबिल असते. वातावरणात नवपालवीचा उग्र गंध भरुन राहिलेला असतो. पुर्वेला चुकार तांबड फुटू लागलेलं असतं. जिकडे तिकडे फक्त निसर्गायन सुरु असतं. मधून चालणारे आपण. वातावरण इतकं नि:शब्द असतं की आपलाच श्वास आपल्याला ऐकू यावा. खरं सांगते, या तंद्रीत किती चाललं ते सुद्धा लक्षात येत नाही.

वसंतात सगळा निसर्ग नटतो. सगळीकडे पुष्पसंमेलन भरतंं. त्याच्या दरबारात अनेक जण हजेरी लावतात. प्रत्येक झाड वेगळं, त्याची फुलं वेगळी, रंग वेगळा, गंध वेगळा. कोणाकोणाचं म्हणून नाव घ्यावं? नजरेत भरतो तो लालभडक पळस, पांगारा, झाडभर फुलांचा मळवट भरलेला चाफा. आपली घाणेरी सुद्धा डवरुन उठते. इटुकलीपिटुकली रंगीबेरंगी फुलं दिवसभर मिरवत बसते. कडुनिंब पांढर्‍या तुर्‍यांच्या मुंडावळ्या बांधून उभा असतो. वसंताची कमाल अशी की पिंपळ सुद्धा देखणा वाटतो.

काही अनोळखी पाहुणे देखील तुमचं स्वागत करतात. सौंदयाची, सुुवासाची अनुभूती घेण्यासाठी फुलापानांची नावंच माहिती असावीत असं थोडंच आहे?

निसर्गाच्या साक्षीनं चालता चालता मनातल्या तारा झंकारतात. एका कोपर्‍यात पं. भीमसेन जोशींचा दमदार आवाज घुमू लागतो. केतकी गुलाब जुही चंपक वन फुले…

मनाच्या दुसर्‍या कोपर्‍यात पं. जसराज गायला लागतात. सब राग बने बाराती….दुल्हा राग बसंत…
मग आशा भोसले गुणगुणू लागते..
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलातुन अमृत भरले
वनावनातुनी गाऊ लागल्या
पंचमात कोकिळा
आला वसंत ऋतु आला….

दोस्तांनो, वसंत ऋतुचं स्वागत करण्याचं अजून एक कारण तुम्हाला माहिती आहे? वसंत येतांना नवचैततन्य आणतो. पण जाताना त्याच्या भैरवीत वर्षाऋतुची बीजं दडलेली असतात. वसंत मावळत असताना चराचर सृष्टीला पावसाचे वेध लागतात. मेघगर्भ वाढायला लागतो. मेघांमध्ये पावसाची गर्भधारणा याच काळात होते असं म्हणतात.

दोस्तांनो, हे सारं तुम्हालाही जाणवू शकतं.
मग काय, एखाद्या रविवारी भल्या पहाटे एखाद्या पायवाटेवर नक्की भेटू या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!