राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन विशेष : घरात बसून ‘ते’ देतात झाडांना पाणी अन् खाद्य

तंत्रज्ञानाशी जुळवली मैत्री, उत्पन्नात भर

0

नाशिक । दिनेश सोनवणे

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती साधली आहे. भारत शेतीप्रधान देश असला, तरी शेतीत जागतिक स्तरावर झालेल्या आमूलाग्र बदल अवलंबण्यात तेवढे यश आलेले दिसत नसले, तरी जिल्ह्यातील सधन शेतकरी परदेशवारी करून आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. याचा परिणाम दिसून येत आहेत. परदेशवारी करून आलेले शेतकरी घरात बसून शेतातील झाडांना खाद्य व पाणी द्यायला लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष उत्पादक शेतकरी आज इस्रायल, दक्षिण आफ्रिकेचे तंत्रज्ञान वापरून शेतीमध्ये वेगवेगळे बदल करु पाहत आहेत. यातून सध्याच्या परिस्थितीत न परवडणारा रोजगार, मजुरांचा तुटवडादेखील भरून निघण्यास मदत होत असल्याचे नाशिककर टेक्नोसॅव्ही शेतकरी करत आहेत.

सुरुवातीच्या काळात बैलांच्या साहाय्याने केल्या जाणार्‍या शेतीत हळूहळू बदल झाले. ग्रामीण भागात विजेचे भारनियमन जास्त असते. केव्हाही विजेची बत्ती गुल होते. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला की, पंप बंद व्हायचे. मग एक विशिष्ट प्रकारचे यंत्र विकसित करण्यात आले. मिस कॉल किंवा फोन केला की, पंप आपोआप सुरू होऊ लागला. यामुळे शेतकर्‍यांच्या विहीर ते शेत घिरट्या घालणे बंद झाले.

शेतीत होत असलेले बदल बघून शेतकर्‍यांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्यासाठी शेतकीचे शिक्षण घेतले. परदेशातील अत्याधुनिक शेती अभ्यासली. प्रसंगी परदेशवारी देखील केली. परदेशात झालेला शेतीतला आविष्कार मायदेशी परत येऊन आत्मसात करण्यास त्यांनी सुरुवात केलेली दिसतेय. नियोजनाअभावी तोटाही झाला मात्र, काळ बदलत गेला तसा शेतकरीही प्रगतीशील होत गेला.

यातून चांगले दिवस आल्याचे स्वतः शेतकरीच सांगत आहेत. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली, तर नक्कीच उत्पन्नात भर पडेल असे शेतकरी सांगत आहेत.

एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हवा असल्यास तुम्हाला उत्कृष्ट नियोजन, खत खाद्यांची योग्य मात्रा याशिवाय पर्याय नाही. यामुळे निर्यातक्षम आणि दर्जेदार उत्पन्न घ्यावयाचे असेल, तर शेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली गेली पाहिजे.

ठिबक सिंचनाला संगणकाची जोड

पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा पर्याय अवलंबला जात होता. परंतु, विजेच्या भारनियमनामुळे पाणी आणि फर्टिलायजरच्या मात्रा कमी अधिक व्हायच्या. यातून निर्यातक्षम उत्पन्न मिळण्यास बाधा यायची. आता ठिबक सिंचन संपूर्णपणे कॉम्प्युटराईज्ड केल्यामुळे एकदा प्रोग्राम दिला की,भारनियमन असतानाही पुन्हा प्रोग्राम देण्याची गरज नसते. यामुळे प्रत्येक झाला पुरेसे पाणी मिळते, यातून उत्पन्न वाढण्यास मदत झाली.

– शरद पेखळे, ओढा


परदेशात जाऊन अभ्यास

अत्याधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला जाण्याची संधी मिळाली होती. तिथे शेतीतील बारकावे जाणले. वायरलेस ऑटोमोशनची प्रणाली तिकडे वापरली जात होती, याबाबत माहिती घेतली. आपल्याकडील विजेचे भारनियमन, मजुरांची कमतरता आणि गगनाला भिडलेली मजुरी यावर पर्याय म्हणून मी या प्रणालीचा अवलंब केला. दहा एकर शेतीला केवळ एक माणूस मजुरी लागते. खर्च वाचला आणि उत्पन्नही वाढले.

– योगेश रिकामे, नाशिक


तंत्रज्ञानाचा दुहेरी फायदा

दक्षिण आफ्रिकेत, इस्रायलला जाऊन शेतीचा अभ्यास केला. तिथूनच नवे तंत्रज्ञान आत्मसात करायला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आज संगणकाचा वापर करून बसवलेले तंत्रज्ञानाने प्रत्येक झाडाशी आम्हाला जोडले आहे. कुठे धोका असेल तर विशिष्ट अलार्म वाजतो त्यामुळे सावधानतेने परिस्थिती हाताळता येते. या तंत्रज्ञानाचा दुहेरी फायदा म्हणजे, पाणीबचत झाली आणि पाण्यातून दिले जाणार्‍या खतांची मात्रादेखील घटली. यामुळे उत्पादन खर्चात बचतही झाली.

– शरद डोखरे, खेडगाव (ता.दिंडोरी)

LEAVE A REPLY

*