राष्ट्रीय संपादन चाचणीसाठी अहमदनगर जिल्हयातील 173 वर्गांची निवड

0

गणोरे (वार्ताहर) – राष्ट्रीय संपादन चाचणीसाठी अहमदनगर जिल्हयातील 173 वर्गांचीनिवड करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. या करीता देशातील प्रत्येक जिल्हयातून इयत्ता तिसरी, पाचवी, आठवीच्या वर्गांची निवड करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता तिसरी व पाचवीच्या प्रत्येकी 61 वर्ग तर आठवीच्या 51 वर्गावर ही चाचणी होणार आहे. या शाळांच्या गुणवत्तेवर राज्याची व देशाची गुणवत्ता निश्चित होणार आहे.

देशभरातील शिक्षणांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. या करीता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेच्यावतीने देशभरातील एकूण शाळामंधून या शाळा निवडल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरून यासाठीच्या प्रश्नपत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत.

त्यात अहमदनगर जिल्हयातील तालुका निहाय संख्या कंसातील दिल्याप्रमाणे अकोले (11), संगमनेर (19), कोपरगाव (14 ), राहाता (12), श्रीरामपूर (11), नेवासा (15), राहूरी (11), पारनेर (10), नगर (12), शेवगाव (11), पाथर्डी (11), कर्जत (9), जामखेड (6), श्रीगोंदा (10), महानगरपालिका (11) अशा एकूण 173 शाळांना या परीक्षेकरीता सामोरे जावे लागणार आहे. या शाळांची निवड राष्ट्रीय संस्थेने केली आहे.

या चाचणीचे स्वरूप शिक्षक प्रश्नावली, शाळा प्रश्नावली, विद्यार्थी प्रश्नावली असे असणार आहे. विद्यार्थ्यार्ंसाठी असणार्‍या प्रश्नावलीत पर्यायी स्वरूपाचे प्रश्नाचा समावेश असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्यात आलेले आहे. योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल करणे अभिप्रेत आहे.

तिसरी व पाचवी करीता भाषा, गणित, पर्यावरण शास्त्रावर आधारीत प्रत्येकी 15 पश्नांचा समावेश असेल तर 8 वी साठी या विषयासोबत सामाजीक शास्त्राचा समावेश असणार आहे.तिसरी पाचवी करीता 90 मिनिटे व 120 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राखीव आहे.चाचणीच्या दिवशी शासकीय स्तरावरून स्वतंत्र दोन पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहे.त्यांच्या मार्फत परीक्षा नियंत्रीत केली जाणार आहे.

 बाहय पर्यवेक्षकीय यंत्रने मार्फत घेतली जाणार चाचणी,  भरारी पथके करणार तपासणी, विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के आवश्यक,   आधारकार्डची असणार सक्ती,  नियमित अभ्यासक्रमावर आधारीत होणार परीक्षा,  तालुकानिहाय निकालानंतर  गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी विकसित केला जाणार कार्यक्रम,  राज्यस्तरावर पेपर तपासणी

स्वतंत्र अभ्यासक्रम नाही : डॉ. जडे  –  या परीक्षेच्या निमित्ताने अभ्यासक्रम कोणता असा प्रश्न शाळांना पडला असून त्या संदर्भात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था संगमनेर यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. अचला जडे यांनी सांगितले की, या चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. सर्व प्रश्न हा इयत्तेच्या क्षमतावर आधारीत असणार आहे. त्यामुळे सध्या राबविल्या जाणार्‍या अभ्यासक्रमावर आधारीतच ही मूल्यमापन प्रक्रीया होणार आहे. या परीक्षांची तपासणी ही ओएमआर पध्दतीने  होणार असून प्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्तेत कोठे आहे हे समजण्यास मदत होणार आहे.

भरारी पथकाची होणार नियुक्ती : वांढरे  – चाचणी दिवशी  भरारी पथक नियुक्त केले जाणार असून परीक्षा काळात जिल्हयातील चाचणीसाठी निवडलेल्या शाळांना भेटी देण्याचे नियोजन भरारी पथकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर निवडलेल्या शाळांना प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अगोदर एक दिवस सीलबंद स्वरूपात पुरविण्यात येणार आहे. तर निवडलेल्या शाळामंधील इयत्तेच्या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त तीस विद्यार्थी चाचणी होणार आहे. मात्र शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार असल्याची माहिती या परीक्षेसाठी जिल्हयाचे काम पहाणारे जेष्ठ अधिव्याख्याता महादेव वांढरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*