राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वलला रौप्य

0
नाशिक : नुकत्याच आसामच्या तेजपूर येथे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने तेरा वर्षाखालील गटात एकेरी प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.
या स्पर्धेत त्याला प्रथम मानांकन मिळाले. प्रज्वलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकाची कमाई केली.  प्रज्वलला उपउपांत्यपूर्व फेरीत आसामच्या अनिमेश गोगईने चांगली टक्कर दिली.
प्रज्वलने या सामन्यातील पहिला सेट २७-२५ असा जिंकला,  तर दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलला ११-२५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने संयमाने उत्कृष्ट खेळ करत तिसरा सेट २५- १५ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत प्रज्वलने उत्तराखंडच्या अंश नेगीचा २१-०७ आणि २१ – १५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्वलचा अंतिम सामना महाराष्ट्राच्या ठाण्याच्या ओम गोवंडी सोबत झाला. या सामन्यात पहिला सेट ओम गोवंडीने २१- १५ अश्या फरकाने  जिंकून आघाडी घेतली.
मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रज्वलने जोमाने खेळ करून हा सेट २१-१६ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या  निर्णायक सेटमध्ये ओम गोवंडीने प्रथमपासून सावध खेळ करून हा सेट २१- १४  असा जिंकून विजेतेपद पटकावले.
तर प्रज्वलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओम गोवंडी आणि प्रज्वल सोनावणे हे दोघेही दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून एकत्र खेळतात.
प्रज्वलने याआधी गेल्या महिन्यात गुंटूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रज्वल नाशिकच्या फ्रावशी  अकॅडमीमध्ये शिकत असून तो गेल्या सात वर्षांपासून नाशिकच्या शिवसत्य मंडळात मकरंद देव यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रज्वलच्या  या यशाबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव अनंत जोशी,  उपाध्यक्ष एस. राजन, डॉ. शिर्मिला कुलकर्णी  तसेच फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ आदिंनी अभिनंदन केले.
प्रज्वल सोनवणे लगेचच २२ नोव्हेंबरपासून कडप्पा, आंध्र प्रदेश येथे  आयोजित राष्ट्रीय  बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो या स्पर्धेमध्येही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक मकरंद देव यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*