राष्ट्रसेविका समितीचे दिमाखदार संचलन

0

आपल्यातील ‘मी’ चा शोध घ्यायला हवा ः भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी) – हिंदू धर्मात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग व सध्याचे कलीयुग अशा चार युगांचा उल्लेख आहे. या युगात अनुक्रमे देव-दानव, राम-रावण, कौरव-पांडव यांच्यात संघर्ष झाला, मात्र सध्याच्या कलीयुगात आपला आपल्याशीच संघर्ष सुरू आहे.
स्वतःतील कलीचा शोध घेऊन त्याचा निःप्पात हे प्रत्येकाचे निहित कर्तव्य बनले आहे. या अर्थाने आज प्रत्येकानेच आपल्यातील ‘मी’चा शोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन दुर्गावाहिनीच्या महाराष्ट्र प्रांताच्या प्रमुख संयोजिका (नाशिक) अ‍ॅड. मीनलताई भोसले यांनी केले.
विजयादशमी हा राष्ट्र सेविका समितीचा स्थापना दिन यावर्षी राष्ट्र सेविका समितिचा हा स्थापना दिन सावेडीच्या समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्त्या दुर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका अ‍ॅड. भोसले, प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य सरकारच्या कवी मंगेश पाडगावकर पुरस्कार विजेत्या बेबीताई गायकवाड, समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका पूनम शर्मा आदी मान्यवर उपस्थित होत्या.
मुख्य समारंभापूर्वी राष्ट्र सेविका समितीतर्फे सावेडी उपनगरातील प्रमुख मार्गावरुन अतिशय दिमाखदार पथ संचलन करण्यात आले. या वर्षी समितीतर्फे प्रथमच राष्ट्र सेविकांच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरात एक वेगळाच उत्साह पसरला होता. तसेच कार्यक्रमाची सुरुवात मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनिषा पूर्ण करु या स्फूर्तिदायी पद्याने झाली.
मीनल भोसले पुढे म्हणाल्या, दिवसेंदिवस महिलांबाबत स्वतःचे व समाजाचे रक्षण हा विषय अत्यंत गरजेचा बनला आहे. विशेषतः वय वर्षे 5 ते 35 या वयोगटात स्वसंरक्षण ही बाब अत्यंत गंभीर बनली आहे.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. मार्गावर नागरिकांनी विशाल व रेखीव रांगोळ्या काढून व फुले उधळून संचलनाचे अतिशय उत्साहात स्वागत केले. सावेडीतील समर्थ शाळा, प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान चौक, आकाशवाणीमार्गे परत समर्थ शाळा असा या संचलनाचा मार्ग होता. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सेविकांनी परिश्रम घेतले.

महिलांच्या पहिल्या सैनिकी शाळेला लवकरच सुरुवात  – सातार्‍यात मुलांसाठीचे भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना झाली. मात्र महिलांसाठीच्या सैनिकी स्कूलची व्यवस्थाच शासनाकडून केली गेली नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी विश्वहिंदू परिषद व राष्ट्र सेविका समितीच्या दुर्गा वाहिनी यांच्यावतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या  संयुक्त प्रयत्नाची दखल घेतली असून लवकरच धुळे किंवा नाशिकमध्ये राज्यातील पहिल्या महिला सैनिकी स्कूलची घोषणा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

*