पंतप्रधानांच्या ताफ्याची रंगीत तालीम; व्यासपीठ मंडप, परिसराचा ताबा एसपीजी दलाकडे
Share

नाशिक । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून आज सुरक्षा दलांनी त्यांच्या ताफ्याची रंगित तालीम घेत काळ, वेळ, स्थळाची चाचणी घेतली. तर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास केंद्राच्या विशेष सुरक्षा ग्रुप (एसपीजी) ने व्यासपीठ, मंडप व परिसराचा ताबा त्यांच्याकडे घेतला.
मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याच्या सहभागाने होत असलेली भाजपची महाजनादेश यात्रा तर नरेंद्र मोदी यांच्या सभेने या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. या साठी झेड प्लस सुरक्षेसह पाच हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे शहर व परिसराला विशेषत तपोवण, औरंगाबाद रोडला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिर सभेसाठी तपोवन परिसराची निवड करण्यात आली असून या ठिकाणी एक ते दिड लाख नागरीक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी सभास्थळी 10 सेक्टर तयार करण्यात आले आहेत. तर पार्किंची एक किलोमीटर दूर व्यवस्था करण्यातआली आहे.
ओझर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर मोदी हेलिकॉप्टरद्वारे मिनाताई ठाकरे स्टेडीयम येथे पोहचणार आहे. येथून ते वाहनाने सभास्थळापर्यंत पोहचतील. आज दुपार पर्यंत व्यासपीठ, मंडप, त्या समोरील प्रेक्षक मंडपामधील कामे जवळपास पुर्ण करण्यात आली आहेत. याची अंतिम पाहणी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केली.
तर तत्पुर्वी सर्व वरिष्ठ अधिकार्यांनी तसेच केंद्रीय सुरक्षा दलांच्या अधिकार्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याची तपासणी केली. तसेच मातोश्री मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी हेलीकॉप्टरमधून पंतप्रधान उतरल्यानंतर तेथून तपोवन सभास्थळी सर्व ताफा किती वेळात पोहचेल, सुरक्षा यंत्रणा, यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांचा शीघ्र प्रतिसाद, सुरक्षा वाहने, मार्गावरील वाहतुक नियंत्रण, वाहनांना ठाकरे स्टेडियम ते सभास्थळ लागणारा वेळ मिनीट, सेकंद या सर्वाची रंगीत तालिम घेण्यात आली.
केंद्रीय सुरक्षा पथके, एसपीजी, एसपीक्यु, कमांडो पथक, मुंबई स्पेशल फोर्स तसेच राज्यातील विविध ठिकाणांवरून अधिकारी कर्मचारी या सभेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
वरिष्ठ अधिकार्यांनाही नो इंट्री
सभास्थळी उभारण्यात आलेल्या व्यासपीठ व व्यासपीठ मंडपाचा ताबा दिल्ली येथील विशेष सुरक्षा दलाने घेतल्यानंतर त्या परिसरातून पोलीस अधिकार्यांसह सर्व पक्षाच्या पदाधिकार्यांना बाहेर काढण्यात आले आहे. या परिसरात केवळ एसपीजी, एसपीक्यु, तसेच झेड सुरक्षा पथकाचे अधिकारी यांचा वावर असणार आहे. प्रत्येकाची कडक तपासणी केल्यानंतरच ठरावी कार्ड धारकांनाच व्यासपीठ परिरात प्रवेश दिला जाणार आहे.