कोरोनाबाधित वृद्धा आढळल्यानंतर अंबड लिंक परिसर सील; कुटुंबातील सात सदस्य विलगीकरण कक्षात

नाशिक । प्रतिनिधी

आज सातपूर अंबड लिंकरोड भागात एका वृध्देला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर महिलेच्या कुटुंबातील 7 जणांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब कोण कोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शहरात आज नवीन 14 संशयितांची भर पडली आहे. या संशयितांपैकी महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात एकुण 29 जणावर उपचार केले जात आहे. यात शहरातील 20 व ग्रामीण भागातील 9 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 306 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 248 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

संशयितांच्या घशातील स्त्रावाचे पाठविण्यात आलेल्या 341 नमुन्यापैकी 300 अहवाल निगेटिव्ह आले असुन आजपर्यत एकुण 5 करोना रुग्ण आढळून आले आहे. तसेच 37 संशयितांने आणि दुसर्‍यांना तपासणीसाठी पाठविलेले 8 असे एकुण 45 असे अहवाल आजपर्यत प्रलंबित आहे.

तसेच विविध राज्यातील विविध भागातून 201 जण शहरात आले आहे. आजपर्यत शहरात स्टॅम्पींग झालेल्या 600 व्यक्ती असुन आजपर्यत स्टीकर लावलेल्या घरांची संख्या 570 झाली आहे. होम कोरंटाईन केलेल्यांची संख्या 124 इतकी आहे.

शहरात जाहीर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट एरिया (प्रतिबंधीत भाग) असलेल्या गोविंदनगर, नवश्या गणपती गंगापूररोड व नाशिकरोड धोंगडेनगर याठिकाणी घरोघर सर्वेक्षणासाठी महापालिका आरोग्य विभागाकडुन 55 पथके कार्यरत झाले आहे.

यात बुधवार (दि.16) समाजकल्याण वसतीगृह नासर्डी पुल येथील निवारा गृहातील एका परप्रांंतीय युवकाला करोना झाल्याचे समोर आले होते. यानंतर आज संजीवनगर अंबड लिंकरोड भागाची भर पडली असुन एक वृध्द महिलेला करोना झाल्याचे समोर आले आहे. याभागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.

यात गंगापूररोड नवश्या गणपती व नाशिकरोड भागातील करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अतिजोखमीच्या व्ंयक्तींना कोरंटाईन करण्यात आले आहे. तसेच गोविंदनगर भागात बाधीत रुग्णांच्या संपर्कात अतिजोखमीचे 20 व कमी जोखमीचे 42, गंगापूर भागातील नवश्या गणपती परिसर भागात अतिजोखमीचे 10 व कमी जोखमीचे 9 आणि नाशिकरोड धोंडगेनगर भागात अतिजोखमीचे 21 व कमी जोखमीचे 17, समाज कल्याण वसतीगृह बजरंगवाडी भागात अतिजोखमीचे 12 व कमी जोखमीचे 153 अशाप्रकारे 63 अतिजोखमीचे आणि 221 कमी जोखमीच्या व्यक्तीवर महापालिका वैद्यकिय विभाग लक्ष ठेवून आहे.

तसेच सातपूर अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात आज आढळून आलेल्या बाधीत रुग्णांच्या घरातील 7 जणांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

संजीवनगर भागात 100 मीटर क्षेत्र प्रतिबंधीत

सातपूर अंबड लिंकरोड भागात असलेल्या संजीवनगर भागातील 63 वर्षीय वृध्देला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर याभागात चार बाजुला 100 मीटर क्षेत्र प्रतिबंधीत म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी महापालिकेकडुन निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू झाले असुन नागरिकांचा सर्व्हेचे काम वैद्यकिय पथकाकडुन सुरू झाले आहे.

वृध्देच्या सुनाची माहिती घेण्याचे काम सुरू

संजीवनगर भागातील बाधीत वृध्देला दोन मुले असुन एक जण पुण्यात कामाला असुन दुसरा मुंबईत पोलीस दलात कार्यरत आहे. ही मुले नुकतेच नाशिकला परतलेले आहे. यातील एक मुलांची पत्नी नाशिक येथील माहेरी गेली आहे. तिची व तिच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी आता पथके रवाना झाली आहे. या महिलेच्या पतीसह दोन मुले, त्यांची मुले अशा सात जणांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वाचा संपर्क अजुन कोण कोणाशी आला, याची माहिती पथकाकडुन घेतली जात आहे.