सापुतारा-बोरगाव रस्त्याची दुरवस्था

लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज

0

हतगड | वार्ताहर वणी-सापुतारा महामार्गावर बोरगांव चौफूली परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावेे लागत आहे. त्यामुळे त्वरीत लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.बांधकाम विभागाने चांगल्या अधिकार्‍यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

वणी-सापुतारा या महामार्गावर बोरगावजवळ रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर  मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांना तर हा रस्ता मृत्युचा सापळा बनत आहे. हा मार्ग धार्मिक, पर्यटन स्थळांना जोडणारा आहे.
या मार्गावरुन गुजरातमधील व महाराष्ट्रातील पर्यटकांची व भाविकांची वाहतुकची मोठी वर्दळ असते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालक आपला मार्गक्रमण सुकापुरकडून व हतगड कनाशी मार्गे बदलवत असतात. परंतु या रस्त्याला देखील मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे जावे तरी कोणत्या मार्गाने हा प्रश्न पडत आहे.  वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
पावसाळ्यापूर्वी सुकापुर ,हतगड कनाशी ,बोरगांव सापुतारा रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असतांना केवळ मुरुमच्या सहाय्याने खड्डे बुजवून मलमपट्टी केली जातेे. त्यामुळे त्याचा परिणाम पावसाळ्यात खड्ड्यांच्या  स्वरुपात दिसायला लागतो. सुरगाणा कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम किती चांगले केले आहे हे नागरिकांना व वाहनधारकांना प्रत्यक्ष पाहायला मिळते.
हे सर्व मार्ग गुजरात राज्याला जोडणारे असून गेल्या कित्येक वर्षापासून याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असतात. हे सार्वजनिक बांधकाम विभागाला ठावूक असते तरी जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे खड्डेमय रस्त्याचे परिणाम नागरिकांना व वाहनधारकांना सहन करावा लागत असतो. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा छोटेमोठे अपघात घडत असतात. या रस्त्याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*