नाशिकच्या प्रज्ञा पाटीलने 57 तास योगाचा विश्वविक्रम मोडला

सतत शंभर तास योगा करण्याचा संकल्प

0
कावनई (किरण रायकर) | इगतपुरी तालुक्यात एका निर्जनस्थळी नाशिक च्या प्रज्ञा पाटील या महिलेने  गेली 16 जूनपासून सतत योगा करून मागील 57 तास योगा करणाऱ्या महिलेचा  विश्वविक्रम आज मोडीत काढला. दरम्यान, हा 57 तासाचा विश्व विक्रम आज दुपारी एक वाजून 38 मिनिटांनी हा विक्रम मोडल्यानंतर जिल्ह्यातील योगाप्रेमींनी जल्लोष केला.

नाशिकच्या योगप्रशिक्षिका योगाचार्य प्रज्ञा पाटील यांनीही इगतपुरी जवळील पिंप्री सदो येथे सलग 57 तासाचा योगाचा विश्वविक्रम मोडीत काढीत इगतपुरी तालुक्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. प्रज्ञा पाटील यांना योगसाधनेचा पूर्वीपासूनच छंद. पण ज्या योगामुळे शरीराबरोबर मनाचाही व्यायाम केला जातो.

त्या योगाच्या विक्रमामुळे योगशास्त्र आणि नाशिक जिल्ह्याचे  नाव जागतिक स्तरावर  जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे नाव अधोरेखित करावे यासाठी प्रज्ञा पाटील यांनी योगात जागतिक विक्रम करण्याचा संकल्प केला होता.

यानुसार दिनांक 16 जून पासून पहाटे साडेचार वाजेपासून या योगसाधनेला पिंप्री सदो गावाजवळ एका शांतस्थळी आरंभ केला. योगशास्राचे विविध आसने अखंडितपणे करीत केवळ द्रव पदार्थाचे सेवन करीत आज दुपारी दीड वाजता त्यांनी तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा सलग 57 तासाच्या सलग योगाचा विक्रम मोडीत काढला.

दरम्यान आजच त्यांचा डॉ.व्ही.गणेशकरण यांचा 69 तासाचा विश्वविक्रम मोडीत काढण्याचा संकल्प असून सलग शंभर तास योगा करून एक नवा विश्वविक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे.

या विक्रमाची नोंद सोमवार दिनांक 19 रोजी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे प्रतिनिधी घेणार असल्याची माहिती आयोजक रोहिणी नायडू यांनी दिली. हा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर आमदार सीमा हिरे, महेश हिरे, भाजपच्या शहर उपाध्यक्षा सोनल दगडे, संध्या शिरसाट, मनोरमा पाटील, दीपाली गवांदे, अश्विनी डोंगरे, मीनाक्षी आहेर, वंदना रकीबे, गौरव पाटील, गौरागी पाटील यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

योगाचा जागतिक विक्रम पार करण्यासाठी योगाचार्य तथा योगप्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सर्व विक्रम मोडीत काढीत जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे.आगामी काळातही योग विद्येला खेड्यापाड्यात तसेच तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रज्ञा पाटील यांचे कार्य जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.
सोनाली दगडे

LEAVE A REPLY

*