Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आजपासून अशोक स्तंभ चौक बंद; व्यावसायिकांचा मनस्ताप वाढणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरात सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामातील अशोक स्तंभ चौकाच्या सुशोभिकरणासाठी आज  गुरूवारपासून (दि२१) या चौकातील सर्व मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसुचना वाहतूक विभागाच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढली आहे.

अधिसुचनेनुसार सीबीएस, मेहेर चौकाकडून अशोकस्तंभकडे येणारा मार्ग, रामवाडी पुलाकडून स्तंभाकडे येणारा मार्ग, वकिलवाडीकडून स्तंभाकडे येणारा मार्ग, गंगापूर रोडकडून स्तंभाकडे व रविवार कारंजाकडे जाणारा मार्ग असे सर्व बाजुकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनांना पर्यायी मार्ग दिले आहेत. त्यानुसार वाहन चालकांनी वाहतुक करावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिक शहराचा समावेश करण्यात आला असून त्याअंतर्गत गेल्या दीड वर्षांपासून त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडचे काम सुरू आहे. अद्यापही हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मेहेर सिग्नल वाहतुकीला खुला झाला असताना, सिबीएस सिग्नल अद्याप सुरू झालेला नाही. चार दिवसांपासून या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात स्मार्टरोडवरून वाहतूक सुरू होणार असताना, आता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अशोकस्तंभ या चौकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आलेली आहे.

स्मार्टरोडमुळे गेल्या दीड वर्षांपासून वाहनचालकांना व या भागातील व्यावसायीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अशातच आता अशोकस्तंभाचे काम सुरू होणार असल्याने व अशोक स्तंभाला जोडणार्‍या सर्व मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद होणार असल्याने वाहनचालकांच्या तसेच या परिसरातील व्यावसायिकांच्या मनस्तापात आणखी भर पडणार आहे.

आरके-रेडक्रॉस होणार दुहेरी
रविवारी कारंजा ते रेडक्रॉस (सांगली बँक) सिग्नल या मार्गावरून एकेरी वाहतूक होते. मात्र, अशोकस्तंभ चौक बंद करण्यात येणार असल्याने सदरचा मार्ग अवजड वाहने वगळून सर्वप्रकारच्या वाहनांना दुहेरी वाहतुकीसाठी खुला असणार आहे. यामुळे आता रेडक्रॉस सिग्नलपासून रविवार कारंजाकडे वाहने जाऊ शकणार आहेत.

हे मार्ग आहेत बंद, असे आहेत पर्याय

* सीबीएसकडून मेहेर चौकाच्या पुढे अशोकस्तंभाकडे जाणारा मार्ग पुर्णपणे बंद पर्याय ः 1. सीबीएसकडून अशोकस्तंभ मार्गे रविवार कारंजाकडे जाणार्‍या शहर बसेस व अवजड वाहने सिबीएस सिग्नलकडून टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, रामवाडी मार्गे पंचवटीकडे जातील.

2. सीबीएसकडून अशोकस्तंभ मार्गे पंचवटीकडे जाणारी वाहने मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल, रविवार कारंजा मार्गे पंचवटीकडे जातील.

3. मेहेर सिग्नलकडून वकीलवाडी मार्गे रविवार कारंजाकडे जाता येईल.

* पंचवटीकडून रामवाडी मार्गे अशोकस्तंभाकडे येणार्‍या दुचाकी वगळता अन्य वाहनांना वाहतुकीसाठी बंद
पर्याय ः 1. पंचवटीकडून रामवाडी पुलामार्गे अशोकस्तंभ, गंगापूर रोडकडे येणारी वाहने बायजाबाई छावणीमार्गे, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका मार्गे वाहतूक होईल.

* गंगापूर रोडकडून अशोकस्तंभ मार्गे रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारा मार्ग बंद.
पर्याय ः 1. गंगापूररोडने येणारी वाहतूक पशुवैद्यकीय दवाखाना, सिद्धेश्वर मंदिर, रामवाडी पुल, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड मार्गे पंचवटीकडे जाईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!