मेधा पाटकर यांच्या अटकेचा निषेध

0

नाशिक । दि. 8 प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाच्या ओदशाला न जुमानता सरदार सरोवर धरणाचे दरवाजे बंद करण्याचा मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गेल्या बारा दिवसांपासून बडवानी जवळील चिखलदारा येथे उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर व इतर आंदोलकांना अटक करण्यात आली.

या अटकेचा निषेध व्यक्त करत मध्यप्रदेश सरकारचा यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने निषेध नोंदवत गाडगे महाराज पुतळयाजवळ निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात समितीने म्हटले आहे की, नर्मदा खोरयामध्ये गेल्या 12 दिवसांपासुन जल सत्याग्रह सुरू आहे़ त्याअंतर्गत मेधा पाटकर या द़ि 27 जुलैपासून उपोषणास बसल्या आहेत.

पण हे आंदोलन शासनाकडुन दडपण्यात येत असुन मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या अटकेच्या निषेधार्थच हे आंदोलन करण्यात आले आहे. या आधिही त्यांच्या आंदोलनासाठी शहरातील विविध संघटनांतर्फे उपोषणही करण्यात आले आहे.

खरतर सर्वोच्च न्यायालयाने द़ि 8 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयानुसार, प्रत्येक प्रकल्पग्रस्तास 60 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार बुडित येण्यापूर्वी किमान 6 महिने विस्थापित धरणग्रस्त कुटुंबांना सर्व नागरी सुविधांसह पुनर्वसन स्थळी पुनर्स्थापित करणे बंधनकारक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याचे मध्य प्रदेश सरकारने खोटे शपथपत्र देउन न्यायालयाची दिशाभुल केली आहे. सरोवराच्या बुडित क्षेत्रात 2 ते 2.5 लाख लोक असताना द़ि 17 जून रोजी प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

धरणाचे दरवाजे उघडावेत, न्यायाधिकरणाचा निवाडा, न्यायालयाचे विविध आदेश व राज्यांचे पुनर्वसन धोरण यानुसार पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, भूमिहीन, मच्छिमार, केवट, कुंभार , टरबूजवाडीवाले , छोटे व्यावसायिक , स्वयंरोजगारी , उद्योजकांचे पुनर्वसन करावे तसेच खोरयातील विस्थापितांना हटविण्यासाठी बळाचा वापर करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात छाया देव, राजू देसले, वासंती सोर , मुकुंद दीक्षित , श्यामला चव्हाण , निशिकांत पगारे , नरेंद्र दातरंगे , अरुण ठाकूर , पद्माकर इंगळे ,श्रीधर देशपांडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*