नाशिक ‘फिल्मसिटी’च्या आशा पल्लवित

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घेतली बैठक

0
मुंबई | नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्याकरिता तांत्रिक आणि आर्थिक सुसाध्यता पुन्हा तपासाव्या असे आदेश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सबंधित विभागाला दिल्याने नाशिक येथील चित्रपट नगरीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

आज मुंबई येथे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक चित्रपट नगरीबाबत बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयवंत जाधव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महसूल विभागाचे उपसचिव संतोष भोगले, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संजय भोकरे, फिल्मसिटीचे  सहव्यवस्थापकीय संचालक पी.एच.आजगेकर आदी उपस्थित होते.

सन २००९ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत नाशिक येथे झालेल्या बैठकीत नाशिक विकास पॅकेजमधून चित्रपटनगरीला मंजुरी मिळाली होती. मात्र हा विषय जागेची उपलब्धता व तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होता. सदर विषयाला पुन्हा चालना मिळाल्याने नाशिक चित्रपट नगरीचा मार्ग मोकळा झाला असून चित्रपटनगरीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे.

आ. जाधव यांनी नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टी निर्माण करण्यात यावी यासाठी अधिवेशनात लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

त्यानंतर आज सदर बैठक राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी नाशिकच्या सर्वलोक प्रतिनिधीना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात आ. जाधव उपस्थित होते.

यावेळी आ. जाधव म्हणाले नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्याकरिता नाशिक विकास कार्यक्रमाअंतर्गत दि. २७ ऑगस्ट २००९ रोजी १० कोटी ठरवून दिलेली रक्कम होती. रक्कम निश्चित केल्यानुसार जिल्हाधिकारी नाशिक यांनी दि ५ नोव्हेंबर २०१४ रोजी मौजे मुंढेगाव, ता.इगतपुरी येथील स.नं.४५९ क्षेत्र ५४.५८ हेक्टर आर या जागेबाबत सविस्तर माहितीसह  महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळास सविस्तर अहवाल सादर केलेला होता.

सदर प्रकल्पासाठी मुंढेगाव ता.इगतपुरी येथील जागा सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता महसूल व वन विभागास प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. महामंडळाने सदर नवीन चित्रनगरी निर्माण करण्यासाठी व्यवहार्यता तपासण्याकरिता मे.मिटकॉन या संस्थेकडून व्यवहार्यता अहवाल तयार करून घेतलेला आहे.

तसेच सदर व्यवहार्यता अहवालाचे विश्लेषण व तपासणी करून हा अहवाल दि.२६ मार्च २०१२ रोजी शासनास सादर केलेला असून सदर चित्रनगरीसाठी प्रस्तावीत असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुंदर असल्याचे सांगितले.

त्यामुळे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक येथे चित्रनगरी निर्माण करण्यासाठी कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. मात्र या प्रकल्पासाठी शासनाकडून दिरंगाई व टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.  

त्यावर बोलतांना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले की, नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्याकरिता तांत्रिक आणि आर्थिक सुसाध्यता पुन्हा तपासण्यात यावे. तसेच त्यांचे विश्लेषण झाल्यानंतर बीओटी तत्वावर सदर प्रकल्प राबविण्यासाठी देता येईल का याचा अभ्यास करून पुन्हा एकदा याविषयावर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आदेश त्यांनी सबंधित विभागाला दिले आहे. त्यामुळे आता नाशिक येथील चित्रनगरीचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*