अमयनेरमा फुटना घाम! नाशिकमाई उना झंडू बाम!

भाजपच्या ‘संकटमोचका’ला नाशिककरांकडून बजरंगलेप 

0

नाशिक । कुंदन राजपूत

देशात ‘नरेंद्र’ आणि राज्यात ‘देवेंद्र’ हे सत्तेच्या ऐरावतावर आरुढ असून देशात ‘रामराज्य’ अवतरल्याचे भक्तांना वाटत आहे. आता ‘रामराज्य’ म्हटले की ‘संकटमोचक’ आलेच. सध्या करवीरनगरीतील चंद्रकांतदादा व जामनेरच्या गिरीश भाऊंची चलती आहे. परवा अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात ‘दे बुक्का अन् घाल पेकाटात लाथ’ हा कार्यक्रम झाला. त्यात थोडीफार धक्काबुक्की गिरीशभाऊंनाही झाली. ही वार्ता कळल्यावर नाशकातील काही तरुणांनी ‘पालकत्वा’चे ऋण फेडण्यासाठी गिरीशभाऊंना जखमेवर चोळण्यासाठी कुरिअरने झंडू बाम पाठवला आहे. तसेच बामसोबत बजरंग लेपही पाठवल्याची चर्चा आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपत इनकमिंगची लाट आली आहे. मनसेनाप्रमुखांच्या भाषेत सांगायचे तर ‘यांना पोरं होत नाही, त्यामुळे दुसर्‍याला झालं पोर की घे मांडीवर’ हे धंदे जोरात सुरू आहेत. ही जबाबदारी प्रामुख्याने दोन संकटमोचकांवर आहे.

एक म्हणजे चंदूदादा आणि दुसरे आपले गिरीशभाऊ. या मोहिमेत चंद्रकात दादा पिछाडीवर असून गिरीशभाऊंंनी धूमधडाका लावला आहे. दिग्गज नेत्यांच्या पोरांना भाजपच्या तंबूत डेरेदाखल करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. मात्र या इनकमिंग धोरणामुळे निष्ठावंत दुखावले असून गिरीशभाऊंच्या होमपीच असलेल्या जळगावात फुलबाज्या उडाल्याचे पाहायला मिळाले.

अमळनेर येथील मेळाव्यात लोकसभा उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील समर्थक आपसातच भिडले. बघताबघता व्यासपीठाचे आखाड्यात रूपांंतर झाले.

विशेष म्हणजे संकटमोचक गिरीशभाऊ हे व्यासपीठावर असताना ही अ‍ॅक्शन मुव्ही सुरू होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांना लोळस्तोवर चोपत होते. यावेळी ‘अँग्री यंग मॅन’ अशीदेखील ओळख असलेल्या गिरीशभाऊंना राग अनावर झाला आणि त्यांनीदेखील या वादात मध्यस्थी करण्यासाठी एन्ट्री केली. पण दोन्ही बाजूने वातावरण हाताबाहेर गेले होते.

त्यामुळे गिरीशभाऊंनाही धक्काबुक्की झाली. संकटमोचकावरच संकट कोसळल्याने त्याच्या भक्तांना धक्काच बसला. गिरीशभाऊ हे नाशिकचे पालकमंत्री. राजकारणात एकमेकाला विरोध होत असला तरी एकमेकांची काळजी घेणे ही आपली राजकीय संस्कृती.

हा धर्म पाळत नाशिकमधील विरोधी पक्षाच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी गिरीशभाऊंना कुरिअरने झंडू बाम व लेप पाठवला आहे. लवकरच संकटमोचक बरे होतील व नाशिकच्या पालकत्वाची धुरा सांंभाळतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*