खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवा, सोशल डिस्टंन्सी मात्र जपा – जिल्हाधिकारी मांढरे

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरू ठेवा, सोशल डिस्टंन्सी मात्र जपा – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्यामुळे शहरी भागातील सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण वाढत आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील ज्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने, रुग्णालये, ओपीडी, आयपीड बंद केली असेल त्यांनी ती नियमित सुरू करावी, तसेच ओपीडीमध्ये सोशल डिस्टन्सीचे नियम जपुन काळजी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

देशभरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांमधून हा संसर्ग मोठ्याप्रमाणात होतो आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित नाशिक जिल्ह्यातही आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता त्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदर संशयित रुग्णांमुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाची सुरु आहे.

मात्र असे निदर्शनास आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली रुग्णालये, दवाखाने, ओपीडी बंद केली आहेत. त्यामुळे सरकारी दवाखाने, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रावर अतिरिक्त ताण वाढतो आहे.

जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की , आपल्या ओपीडी नियमित सोशल डिस्टंन्सी जपुन सुरू कराव्यात. तसेच यादरम्यान आपापल्या ओपीडीत, दवाखान्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोनाचे संशयित आढळल्यास किंवा काही शंका असल्यास तत्काळ महापालिका, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी तसेच तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

आपल्या विभागातील अथवा तालुक्यातील संबंधित शासकीय आरोग्य यंत्रणा (तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या सर्वांना संशयित रुग्णाबाबतची माहिती (संपूर्ण नाव, वय, लिंग,पत्ता, मोबाइल क्रमांक, परदेशात भेट दिली असल्यास देशाचे नाव आणि भारतात परतल्याची दिनांक) संकलित करून शासकीय अधिकाऱ्यांना त्वरित दूरध्वनीवरून द्यावी, जे खाजगी डॉक्टर्स आपल्या अत्यावश्यक सेवांची नितीमुल्ये बाळगण्यात कसुर करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com