Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिक जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक : शिवसेना, राष्ट्रवादीचे सदस्य सहलीला

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (दि.2) निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्याच्या दृष्टीने आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि.28) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सहलीला रवाना झाले.

जिल्हा परिषदेमध्ये एकाही राजकीय पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येईल, इतके बलाबल नाही. यामुळे दोन पक्षांनाच एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. हाच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ठेवण्याचा निर्णय या महाआघाडीने घेतला असून जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्याप्रमाणे ज्या पक्षाकडे सर्वाधिक सदस्य संख्या आहेत. त्यांना अध्यक्षपद त्याखालोखाल सदस्य संख्या असणार्‍या राजकीय पक्षाला उपाध्यक्षपद असा फॉर्मुला ठरलेला आहे.

गुरुवारी (दि.2) अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ घातली असून या पार्श्वभूमीवर आज (दि.28)शिवसेनेचे सदस्य पाथर्डी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये एकत्र जमले होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही राष्ट्रवादी भवन येथे एकत्र आले होते.त्यानंतर हे सर्व सदस्य एकत्र येत हॉटेलमधून दुपारनंतर पुणेमार्गे गोव्याकडे रवाना झाले.

याप्रसंगी माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,आ.नरेंद्र दराडे,आ.किशोर दराडे,आ.सुहास कांदे,शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे,उपाध्यक्ष नयना गावित शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार,महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील,विष्णुपंत म्हैसधूणे,उदय सांगळे आदी उपस्थित होते.


काँग्रेस सदस्य सामील नाही

जिल्हा परिषदेत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी महाविकास आघाडी राहणार,असे सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र,आज (दि.28) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीसाठी रवाना झाले. मात्र, त्यांच्याबरोबर काँग्रेसचा एकही सदस्य सहलीसाठी त्यांच्यामध्ये सामील झाला नाही. काँग्रेसचे सदस्य लवकरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सामील होतील, असे सांगण्यात येत आहे.


शंभर टक्के यश आमचे

आघाडीच्या माध्यमातून शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सर्व सदस्य एकत्र जमले असून अध्यक्ष,उपाध्यक्षपदाबरोबरच विषय समिती सभापतीसाठीही महाविकास आघाडीकडे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीला शंभर टक्के यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे.

आ.दादा भुसे,माजी राज्यमंत्री ग्रामविकास


महाविकास आघाडीचीच सत्ता

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षासह विषय समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य एकत्र असून महाविकास आघाडीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर येणार,याची आम्हाला खात्री आहे.

भाऊ चौधरी,संपर्कप्रमुख शिवसेना


जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षपदासह सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेस हे सर्व प्रथमच महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले असून आमच्या समवेत तीन अपक्षही आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांसह,पंचायत समिती वरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल.

रवींद्र पगार,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!