Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

बायोमेट्रिक मशीन खरेदीत भ्रष्टाचार; जि. प. सर्वसाधारण सभेत सदस्यांचा आरोप

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सेवकांच्या बायोमेट्रिक हजेरीसाठी बसवलेल्या मशीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केला. सहा महिन्यांपूर्वीच जिल्ह्यात १२२ आरोग्य केंद्रांमध्ये बसवण्यात आलेले हे बायोमेट्रिक मशीन मशिन्स बंद पडले आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. विद्यमान पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सभा असल्यामुळे बहुतेक सदस्यांनीही आवर्जून हजेरी लावली. सदस्य संजय बनकर यांनी आरोग्य केंद्रात बसवलेल्या बायोमेट्रिक मशिन्स कोणाकडून खरेदी करण्याचे आदेश होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे गौडबंगाल सभागृहासमोर उघड केले. १२२ आरोग्य केंद्रांत हे मशिन्स बसवण्यासाठी संबंधित आरोग्य अधिकार्‍यास विशिष्ट एजन्सीकडूनच खरेदी करण्याचा आग्रह धरण्यात आला होता.

यामुळे १२ हजारांना सहज मिळणारे हे मशीन २२ हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. ते कोणाच्या सांगण्यावरून एकाच एजन्सीकडून खरेदी करण्यात आले? याची चौकशी करावी. मात्र ठेकेदाराला सर्व पैसे वर्ग झालेले असताना आता चौकशी करण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताच मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी तरीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावर मॅडम, हे फार गोंडस उत्तर झाले हो, खरेदी करण्यापूर्वी चौकशी का केली नाही, याचेही उत्तर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांंनी द्यावे, अशी मागणी बनकर यांनी केली.

डॉ. विजय डेकाटे यांनी याचा खुलासा करत नियुक्ती होण्यापूर्वीच ९० टक्के बायोमेट्रिक मशिन्स बसवण्यात आल्याचे सांगितले. पंधरा आरोग्य केंद्रांवर सोलर मशीन बसवण्यात आले आहे. त्याचा एक लाईट ३४०० रुपयांना तर बॅटरीची किंमत तब्बल ६४ हजार रुपये आहे. हा पांढरा हत्ती आपण का पोसतो, असा सवाल डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उपस्थित केला. यापुढे अशा महागड्या प्रकल्पांना मान्यता न देण्याची सूचना करत बसवण्यात आलेल्या प्रकल्पांची दुरुस्ती करण्याचे काम संबंधित कंपनीला देण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना केली.

एनआरएचएमचा मुद्दा गाजला
एनआरएचएम (राष्ट्रीय आरोग्य मिशन)अंतर्गत आरोग्य केंद्रांसाठी मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहत असल्याचे वास्तव सदस्य बनकर यांनी समोर आणले. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील जिल्हा परिषदांच्या तुलनेत नाशिक खर्चात अत्यंत मागे आहे. पाच वर्षांत फक्त एकच आरोग्य केंद्र उभारले आहे. ‘एनआरएचएम’च्या माध्यमातून आरोग्य केंद्र दुरुस्तीच्या कामात अनेक त्रुटी आहेत. कोण कधी येतो अन् रंग लावून जातो हे त्या गावातील सरपंचाला समजत नाही. मुंढेेगाव (ता. इगतपुरी) केंद्र हे गावापासून दीड किलोमीटरवर असून तेथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेलाईन ओलांडून जावे लागते. तेथे ग्रामस्थांनी पोहोचायचे कसे, असा प्रश्न उदय जाधव यांनी उपस्थित केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकरणी खुलासा करत जिल्ह्यातील ५९२ उपकेंद्रांना प्रत्येकी सात लाख रुपये मंजूर असल्याचे सांगितले.

‘पीएमएस’ बंद करा
राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिक जिल्हा परिषदेत बसवण्यात आलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) ही ऑनलाईन कार्यप्रणाली वारंवार बंद पडत असल्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांना तीन-चार महिने कामांची देयके दिली जात नाही. याविषयी अधिकारी व सदस्यांमध्ये मोठी नाराजी वाढली असून ही प्रणाली मार्चपर्यंत बंद करण्याची मागणी डॉ. कुंभार्डे यांनी केली. मात्र कामात सुसूत्रता आणण्यासाठी ही प्रणाली आवश्यक असून दोन आठवड्यांत सर्वांची बिले दिली जातील, असे आश्वासन भुवनेश्वरी एस. यांनी दिले. अखेर ही प्रणाली बंद करण्याचे आदेश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!