येवला : बेमोसमी पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे हाल

0

विखरणी वार्ताहर : येवला तालुक्यातील उत्तर भागातील विखरणी, कातरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, गुजरखेडे, कानडी परिसरात काल वादळासह आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

सोबतच वादळामुळे काल दुपारपासून खंडित वीजपुरवठा आज सकाळ पर्यंत सुरू न होऊ शकल्याने वस्तीवर रहाणाऱ्या नागरीकांना संपूर्ण रात्र अंधारात काढण्याची वेळ आली. शिवाय पिण्याचे पाणी नसल्याने जनावरांना पाण्याविना ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

विखरणी येथील अनेक शेतकऱ्यांचा चारा कालच्या वादळाने उडून गेल्याने आता परत एकदा जनावरांना चारा विकत आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उडालेला चारा गोळा करून परत साठवण्यास सुरवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे विकत चारा मिळणेही दुरापास्त झाल्याने शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चाऱ्याचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वस्तीवर रहाणाऱ्या बहुतांशी शेतकऱ्यांची घरे पत्र्याची असल्याने रात्रीच्या वादळामुळे पत्र्याचा मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने मुलाबाळांसह संपूर्ण रात्र घराबाहेर काढण्याची वेळ आली तर, अनेकांना दुसऱ्याच्या घराचा आसरा घ्यावा लागला. वेधशाळेच्या अंदाजानुसार गुरुवार पर्यंत बेमोसमी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे

LEAVE A REPLY

*