Type to search

नाशिक

मनविसेतर्फे येवला येथे गांधीगीरी पध्दतीने टोमॅटो व कांद्याचे मोफत वाटप

Share

धुळगाव प्रतिनिधी : मनविसेतर्फे येवला येथे सकाळी नगर – मनमाड हायवेवर गांधीगीरी पध्दतीने टोमॅटो व कांदा ची मोफत वाटप करण्यात आली. टोमॅटो व कांद्याचे भाव अतिशय अल्पदरात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या गोष्टीचा निषेध केला.

यंदाच्या हंगामातील सुरुवातीला महिनाभरात चांगले दाम हाती टेकवत उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर लाली आणणाऱ्या ‘टोमॅटो’ने गेल्या चारपाच दिवसात शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. येवला बाजार समितीत मंगळवारीही टोमॅटो बाजारभावात मोठी घसरण होताना प्रतिकॅरेट किमान ५० ते कमाल १०१ (सरासरी ८०) रुपये असा बाजारभाव मिळाला.

गेल्या काही दिवसात बाजारभावात घसरण होताना उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले असताना हक्काचे दोन अधिक पैसे हाती टेकवणाऱ्या ‘टोमॅटो’नेही तीच वाट धरली आहे. यंदाच्या हंगामातील टोमॅटो शेतशिवारातून बाहेर पडताना महिन्यातील १५ तारखेपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत येण्यास सुरुवात झाली.

येवल्यातील सुरुवातीच्या मुहर्तालाच टोमॅटोला प्रतिक्रेट किमान ७५१ ते कमाल ८५१ (सरासरी ७५१ रुपये) असा भाव मिळाला. पुढे गेल्या महिनाभरात येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोने प्रतिक्रेट किमान ४०० ते कमाल ७५१ रुपये (सरासरी ६५० रुपये) असे दाम उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती टेकवले. यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच चांगला बाजारभाव देणारा ‘टोमॅटो’ पुढील काळातही हंगाम संपेपावेतो बाजारभावाबाबत टिकून राहिल्यास या ना त्या कारणामुळे उभं ठाकलेलं ‘अर्थसंकट’ काही अंशी तरी दूर होण्यास मदत होईल, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, दिवसागणिक टोमॅटो बाजार खाली येत गेल्याने महिनाभरातील शेतकऱ्यांच्या गालावर आलेली लाली गुल झाली आहे.

उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक खर्चाचाही मेळ बसवत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला बाजार समितीच्या शहरातील मुख्य आवार भाजीपाला शेडमध्ये दररोज दुपारी टोमॅटोचे लिलाव होतो. जवळपास ५ ते १० हजार क्रेटसची आवक होते. मंगळवारी साडेपाच हजारच्या आसपास टोमॅटो क्रेटची आवक झाली.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मनसे विद्यार्थी सेनेने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन छेडले. यावेळी मनसे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, शहरअध्यक्ष गौरव कांबळे, यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश लासुरे ,तालुका अध्यक्ष राहुल जाधव, शहर अध्यक्ष महेंद्र जाधव , सरचिटणीस लखन पाटोळे, उपाध्यक्ष सागर पवार, संघटक गणेश चव्हाण, सुमित बगडाने , भरत भुजाडे , मयुर कोथमिरे , मयुर मढवइ, गणेश क्षिरसागर, योगेश मढवइ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!