Type to search

हिट-चाट

मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव जल्लोषात

Share

नाशिक । एकीकडे रंगमंचावरील मनमोहक कलाविष्कार, सभागृहात रंगलेल्या कलात्मक मैफली, वक्तृत्व, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्पर्धकांच्या बुद्धीचा लागलेला कस तर दुसरीकडे आल्हाददायक निसर्गाच्या साक्षीने आपल्या ललित कलांच्या सादरीकरणात तल्लीन झालेले विद्यार्थी कलाकार अशा वातावरणात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा केंद्रीय युवक महोत्सव पार पडला.

या महोत्सवात सर्वसाधारण विजतेपदाचा बहुमान सहा पारितोषिकांसह कोल्हापूर विभागाने पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत नाशिकच्या प्रिया जैन व मिमिक्रीमध्ये आदेश लांडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विद्यापीठाच्या आवारात आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट- नाट्य कलावंत दिगंबर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सत्रासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील, वित्त अधिकारी मगन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

एकमेकांची साथसंगत करून व सहकार्य करून कलाकारांनी प्रगती करावी, असे आवाहन नाईक यांनी केले. संघर्ष आणि ताणतणाव हे प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत. त्यामुळे न डगमगता व सतत प्रयत्नरत राहून यश मिळवण्याचा कानमंत्र त्यांनी दिला.

कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी आगामी काळात विद्यापीठात स्वतंत्ररीत्या ललित कला विभाग सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची 2 ते 6 डिसेंबर दरम्यान गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात होणार्‍या ‘इंद्रधनुष्य -2019’ स्पर्धेसाठी निवड केली जाईल, असे प्रा. डॉ. विजय पाटील म्हणाले. उद्घाटन सत्रात मुंबई येथील दिव्यांग विद्यार्थिनी निकिता धूम हिने सादर केलेल्या नृत्याने उपस्थित सर्वांची मने जिंकली.

स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सदानंद जोशी व मोहिनी पोतदार (रंगमंचीय कला विभाग), आनंद अत्रे व मोहन उपासनी (संगीत विभाग), अमित घरत (नृत्य विभाग), प्रशांत भरवीरकर व पीयूष नाशिककर (वाङ्मय विभाग) आणि केशव कासार व मुक्ता बालिगा (ललित कला विभाग) यांनी काम बघितले. रवींद्र राजुरीकर व हर्षद वडके यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन शाम पाडेकर यांनी केले. या स्पर्धेत विविध स्पर्धा प्रकारात सर्वाधिक बक्षिसांची कमाई करणारा कोल्हापूर विभाग सांघिक विजेता ठरला.

स्पर्धेचा निकाल
शास्त्रीय गायन : अनघा पाटील (अमरावती), सुगम गायन : प्रशांत काजरेकर (कोल्हापूर), शास्त्रीय वाद्य संगीत : अनघा पाटील (अमरावती), शास्त्रीय वाद्य संगीत (पखवाज – तबला) : सुजित तांबे (कोल्हापूर) , स्पॉट फोटोग्राफी : सौरभ डोळे (नाशिक), वक्तृत्व : प्रिया जैन (नाशिक), समूह गीत : कोल्हापूर विभाग, समूह नृत्य : पुणे विभाग, फोक ऑर्केस्ट्रा : कोल्हापूर विभाग, एकांकिका : कस्टमर केअर (नाशिक), लघुनाटिका : बाजार (पुणे), मूक अभिनय : कोल्हापूर विभाग, प्रश्नमंजुषा : नाशिक विभाग, वादविवाद : कोल्हापूर विभाग, शास्त्रीय नृत्य : स्वराली जोगळेकर (पुणे), मिमिक्री : आदेश लांडगे (नाशिक), विशेष पारितोषिक : निकिता धूम (मुंबई)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!