जागतिक एड्स दिवस : ‘एड्सबाधित’ ५०१ गर्भवतीनी दिला ४७८ निरोगी बालकांना जन्म

जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय

भारत पगारे
एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी एक हजाराहून अधिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेक्स वर्कर्सपासून ते ट्रक ड्रायव्हर व तृतीयपंथींपर्यंत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या काही वर्षांत एचआयव्हीच्या नवीन संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी होण्यास मदत मिळणार आहे. हे चित्र आशादायक आहे.

नाशिकमध्येही गेल्या सात वर्षांत एचआयव्हीबाधित मातांच्या 501 बाळांपैकी केवळ 23 बाळांनाच आजाराची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. एचआयव्हीबाधित गर्भवतींना ‘एआरटी’चे तत्काळ उपचार सुरू करण्यात आल्याने त्यांच्या गर्भातील बाळांना या गंभीर आजाराची लागण झाली नसल्याने आढळून आले आहे.

सर्व प्रकारच्या प्रयत्नांमुळेच एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी-कमी होत आहे. मोजक्या दशकांपूर्वी भारतात दरवर्षी तब्बल दोन ते अडीच लाख नवीन व्यक्तींना एचआयव्ही संसर्ग होत होता आणि यामध्ये रक्त व रक्तघटकांच्या संक्रमणाद्वारे होणार्‍या संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांवर होते. आज दरवर्षी नवीन व्यक्तींना होणार्‍या संसर्गाचे प्रमाण 80 हजारांवर आले आहे आणि रक्तघटकांच्या संक्रमणाद्वारे होणार्‍या संसर्गाचे प्रमाणदेखील एक टक्क्यावर आले आहे.

अर्थातच, त्यासाठी जनजागृतीच कारणीभूत ठरली आहे. केवळ रक्ताद्वारे नव्हे एचआयव्हीबाधित गरोदर मातेकडून जन्मणार्‍या नवजात बाळास होणार्‍या संसर्गाच्या प्रमाणातही उल्लेखनीय घट झाली आहे आणि त्यासाठी एचआयव्ही विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) कमी करणारी प्रभावी उपचार पद्धती खूप उपयुक्त ठरत आहे. त्याचाच भाग म्हणून आता काही कोटी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी आवर्जून केली जात आहे आणि मातेकडून मुलास होणार्‍या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यात यश आले आहे.

दुसरीकडे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (नॅको) निर्देशांनुसार महाराष्ट्रात ‘एचआयव्ही’बाधितांची नोंदणी होऊन उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षात तीन लाख रुग्णांची नोंदणी होऊनही त्यापैकी सुमारे 63 हजार रुग्ण अद्याप मोफत विषाणू प्रतिबंधक उपचारापासून (एआरटी) दूरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. 1998 सालापासून आतापर्यंत राज्यात सुमारे 70 हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. नोंदणी केलेल्यांपैकी उपचारार्थींसह अन्य रुग्णांमधील हरवलेल्या रुग्णांची शोधमोहीम घेतल्यानंतर ही बाब समोर आली. नाशिक जिल्हा रुग्णालय व येथील ग्रामीण तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे बाधित उत्तर महाराष्ट्रातून येतात.

त्याची आकडेवारी पाहिली तर, दरवर्षी बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांत म्हणजेच सन 2005 पासून ऑक्टोबर 2019 पर्यंत 17 लाख 18 हजार 443 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 20 हजार 860 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेषो 6. 11 वरून आजमितीस 0.35 पर्यंत पोहोचला आहे.

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच सर्वाधिक प्रमाणात एचआयव्हीचा संसर्ग होत आहे. आजही तिच परिस्थिती आहे. रक्ताद्वारे आणि मातेकडून मुलाला होणार्‍या संसर्गाचे प्रमाण फार कमी झाले आहे आणि विषाणूचा 95 टक्के संसर्ग हा केवळ लैंगिक संबंधातूनच होतो असल्याचे लक्षात आले आहे.

राज्यात सध्या 3 लाख 16 हजार 784 एचआयव्ही बाधितांची नोंदणी झाली आहे. नोंदीच्या रुग्णांपैकी 2 लाख 12 हजार 764 रुग्ण सध्या उपचारासाठी ‘फॉलोअप’ घेत आहेत. त्यापैकी 2 लाख 11 हजार 569 रुग्ण प्रत्यक्षात ‘एआरटी’ केंद्रावर जाऊन उपचार घेत आहेत. 1998 सालापासून या रुग्णांची नोंदणी करण्यात येऊ लागली. ही आकडेवारी पाहता तेवढ्या रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे समोर आले.
एचआयव्ही बाधितांसाठी आजच्या घडीला सर्वांत प्रभावी औषध म्हणजे ‘डोल्युटेग्रॅव्हिर’ (डीटीजी) हे असल्याचे सिद्ध झाले आहे.

येत्या काही काळात देशातील 600 एआरटी सेंटरवर ही औषधी मोफत उपलब्ध केली जाणार आहे. या नवीन औषधाचे दुष्परिणाम कमीत कमी आहेत आणि फार कमी कालावधीत ‘व्हायरल लोड’ कमी करण्याची क्षमता या औषधाची सर्वाधिक आहे. त्यामुळे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन व थर्ड लाईन ट्रिटमेंटमध्ये या औषधांचा उपयोग रुग्णांना होणार आहे.

एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घेणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या ट्रिटमेंटमध्ये सातत्य ठेवले तर, चांगले आयुष्य जगू शकतो. व्हायरस वाढत नाही. काळजी करू नका, काळजी घ्या. नियमित औषधे घ्या.
-डॉ. सुनील ठाकूर, बालरोग तज्ज्ञ व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, नाशिक.

पथकाने मॅटर्निटी होम येथे जनजाग़ृती केली आहे. नवजात बाळांना संसर्गापासून वाचविण्यात आले आहे. कुणालाही या संसर्गाबद्दल मनात शंका असेल त्यांनी आयसीटीयू केंद्रात तपासणी करावी. नाव व अन्य माहिती गोपनीय ठेवली जाते.
-डॉ. योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण पथक, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com