Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोलिसांनी वाचवले सव्वाशे संसार; घटस्फोटाच्या अर्जांमध्ये वाढ

Share

नाशिक । सासरकडून छळ होत असल्याच्या तक्रारी तसेच या कारणावरून घटस्फोट मागण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत 120 संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले आहेत. सासरकडून होणारा छळ तसेच घटस्फोटासाठी त्यांच्याकडे तब्बल 957 अर्ज आले होते.

सुशिक्षित समाजावरही पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येत आहेत. यास मोबाईल व सोशल मीडियाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत होताना दिसत आहे. कुटुंबाची बसलेली घडी विस्कटली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.

मागील दीड वर्षभरात 957 पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गार्‍हाणी समजून घेतली गेली; तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला गेला.

समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या 957 अर्जांपैकी 125 संसार पोलिसांनी वाचवले आहेत. ज्यामध्ये समझोता झाले असे 178 केस न्यायालयात पाठवल्या तर ज्यामध्ये तडजोड होऊ शकले नाही अशा 212 जणांचे अर्ज पोलीस ठाण्याला पाठविण्यात आले आहेत.

महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदार्‍यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे.

अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंध धोक्यात सापडतात. त्यांच्यातील समज- गैरसमज दूर करून मुलांच्या हिताबाबत महत्त्व पटवून दिल्यानंतर अनेकांनी तडजोडी मान्य केल्या आहेत. अशी मागील वर्षभरात 118 कुटुंबे आहेत, तर चालू वर्षी पाच महिन्यात 17 संसार पोलिसांनी वाचवले आहेत.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. शहरात वर्षभरात दोनशे ते अडीचशे गुन्हे फक्त शहरातच दाखल होत आहेत. पोलिसांच्या या महिला विशेष सेलमार्फत समुपदेशनाचा पर्याय वापरला जात असून अनेकांचे संसार वाचवले जात आहेत.

महिलांमध्ये सजगता
काही समज-गैरसमजातून प्रकरण हाताबाहेर जाते. यात सोशल मीडियाचा प्रामुख्याने व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकचा वापर कारणीभूत ठरत आहे. परंतु महिलांना कायद्याचे सामान्यज्ञान शहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग आहेत. तसेच संसार वाचविण्यात महिलांचाच अधिक प्राधान्य असल्याचे दिसून येते.
– सुभाष ढौले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महिला शाखा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!