Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आता बसस्थानकात गुडघेदुखीने त्रस्त प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा

Share

नाशिक । विविध कारणातून एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका करण्यात येत असतानाच, ज्येष्ठ नागरिक आणि गुडघेदुखीने त्रस्त प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे आदेश मुख्यालयाकडून विभागांना देण्यात आले आहेत.

49 मजली इमारत स्वखर्चाने उभारणार्‍या महामंडळाकडे व्हीलचेअरच्या खरेदीसाठी निधी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून आईजीच्या जिवावर बाईजीची उदार, अशी गत एसटी महामंडळाची झाली आहे. एसटी बस स्थानकात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी कोणत्याच सुविधा नाहीत. अनेक स्थानकांत रॅम्पच नसल्याने व्हीलचेअर सुविधा देण्याचा प्रश्नच येत नाही. यामुळे ज्येष्ठ प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.

या पार्श्वभूमीवर, पहिल्या टप्प्यात तरी स्वयंसेवी संस्थांकडून व्हीलचेअर घेण्याचा निर्णय झाला आहे. एसटी स्थानकांसह तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे या ठिकाणी ज्येष्ठांना सुविधा देण्यासाठी रेडक्रॉस, रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांच्याकडून व्हीलचेअर उपलब्ध करून घ्याव्यात. संबंधित संस्थांसोबत तातडीने पत्रव्यवहार करून 15 दिवसांत व्हीलचेअर ताब्यात घेत याची माहिती मुख्यालयाला द्यावी’, असे एसटीच्या मुख्यालयाने विभागांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

महामंडळाच्या महत्त्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात वारेमाप उधळपट्टी होत असताना, महामंडळाकडे ज्येष्ठांसाठीच व्हीलचेअर घेण्यासाठी निधी का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात एकूण 250 एसटी आगार आणि 597 एसटी स्थानके आहेत. अनेक एसटी स्थानकांच्या शहरात या स्वयंसेवी संस्था कार्यरत नाहीत. अशा स्थानकांनी प्रवाशांना व्हीलचेअर कशा उपलब्ध करून द्याव्यात, याची कोणतीही स्पष्टता महामंडळाच्या आदेशात नाही.

यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ज्येष्ठांना खूश करण्यासाठी ही घोषणा करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे व्हीलचेअरची खरेदी न करता खासगी संस्थाच्या मदतीने प्रवाशांना व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र याची देखभाल-दुरुस्ती महामंडळ करणार आहे, आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!