Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

Share

नाशिक । शहरातून अल्पवयीन मुलींसह मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दिड वर्षांत तब्बल 423 मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी 294 मुला-मुलींचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश मिळाले. मात्र, या बेपत्ता झालेल्यांपैकी अजूनही 139 मुला मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

शहरातून गायब झालेल्यांपैकी एकुण 91 मुले असून पैकी 87 सापडले आहेत. 242 मुली असून अद्याप 35 सापडलेल्या नाहीत. न सापडणार्‍यांमध्ये मुलींची संख्या जास्त असणे ही अधिक चिंताजनक बाब आहे. यातील बहुतेक मुली अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अपहरण (मिसिंग) प्रकरणांमधील काही मुली परराज्यात असण्याची शक्यताही स्थानिक पोलिस अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात आली आहे.

नकळत्या वयातील प्रेम प्रकरणावर अनेक चित्रपट, वेबसिरीज आल्या. त्यातही ‘सैराट’ चित्रपटानंतर प्रेम हेच सर्वस्व असे मानत अनेक अल्पवयीन प्रेम प्रकरणात अडकत घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्याचे या क्षेत्रात काम करणार्‍यांचे निरीक्षण आहे. या चित्रपटानंतर अल्पवयीनांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे खुद्द पोलीस अधिकारी सांगतात. अशा प्रकारे दाखल होणार्‍या प्रकरणांचे ‘सैराट’ नामकरण केले आहे.

गायब झालेल्या मुला-मुलींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असते. त्यांच्या मित्र-मैत्रिणीकडून, कधी घरच्या मंडळीकडून मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणाची आणि त्याला होणार्‍या विरोधाची माहिती मिळते. ग्रामीण भागात पालकांचा अशिक्षितपणा, तर शहरी भागात पालकांच्या उच्चविद्याविभूषितपणाचा फटका मुलांसह पालकांना बसतो. समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना हवी ती माहिती सहजपणे उपलब्ध होते. आपले कुतूहल शमविण्याचा ते प्रयत्न करतात. त्यातून गैरप्रकार घडतात. साधारणत: 12 ते 15 वयोगटातील अल्पवयीन मुली या भूलथापांना बळी पडत सर्रास घर सोडतात. अचानक कधी पालक किंवा पोलिसांच्या तावडीत ते सापडतात.

अशा वेळी पळवून नेणार्‍या मुलावर मुलीचे कुटुंबीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करतात. पोलीस त्या मुलाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करतात. या सर्व प्रकारात काही मुली गरोदर असल्याचे जेव्हा समोर येते, तेव्हा पालक हबकून जातात.

तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डनुसार पाच वर्षांत मिसिंग दाखल असलेल्या मुला-मुलींच्या शोधासाठी स्पेशल मिसिंग सर्च ड्राइव्हचे जुन 2018 मध्ये आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार सर्वच पोलिस ठाण्यांतील अधिकार्‍यांमार्फत मिसिंग प्रकरणात आढळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध सुरू करण्यात आला होता.

यामध्ये राज्यातील इतर मोठी शहरे तसेच इतर राज्यातील अधिकार्‍यांशीही समन्वय साधन्यात आला होता. यातून इतर शहरातच अनेक मुलींचा शोध लागण्यास मदत झाली होती. मात्र यानंतर पुन्हा तसा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसत नाही.

कुमारीका माता, अनाथ बालकांचा प्रश्न गंभीर
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे तसेच कुमारी मातांचे प्रमाणही वाढले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला तर नकळत्या वयात जडलेले प्रेम, त्यातून निर्माण होणारे शारीरिक आकर्षण, यामुळे अल्पवयीन मुलांनी घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. या घटनांमुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, होणार्‍या बाळांना कुमारी माता सांभाळण्यास तयार नसल्याने बहुतांशी बाळांना अनाथाश्रमात दाखल केले जाते. काही बेवारस सोडली जातात. यामुळे वेगळाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!