PhotoGallery : वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यावी : राजेंद्र जोशी

0

नाशिक( प्रतिनिधी) : आदिवासी वारली जमात अभावग्रस्त असूनही कोणत्याही प्रकारची तक्रार करीत नाही. निसर्गाच्या सानिध्यात ते जीवनात आनंद घेतात. साधी, सोपी, हव्यास नसलेली जीवनशैली जगतात व समाधानी असतात. शहरातील कलाप्रेमींनी वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यायला हवी असे प्रतिपादन शंकराचार्य न्यास संचलित गोशाळेचे प्रमुख राजेन्द्र जोशी यांनी केले.

ग्रीन केअर संस्था, विनर ग्रुप आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे काल रविवारी( दि. 13) ‘ चित्रांजली ‘ वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित या प्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर उपस्थित होते. कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात झालेल्या या प्रदर्शनात ज्येष्ठ कलाशिक्षक पूर्णिमा आठवले, त्यांच्या विद्यार्थिनी शर्वरी देशपांडे, सिमरन संधू, श्रावणी शिंदे, हर्षाली पुनावाला,ओवी नानिवडेकर यांची ५०पेक्षा जास्त वारली चित्रे मांडण्यात आली. संजय देवधर यांनी कॅनव्हासवर रंगवलेली पेंटिंग्ज आणि सिन्नरचे रवींद्र वैष्णव यांच्या आकर्षक पॉटसचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती गाडगीळ आणि कर्नल अरुण गाडगीळ होते. प्रारंभी पूर्णिमा आठवले यांनी स्वागत केले व संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वाती गाडगीळ म्हणाल्या, कलाकार बुद्धी, मन, हृदय आणि बोटांच्या समन्वयातून कलानिर्मिती करतात. माणसाचा ‘ मानव ‘ होण्यासाठी कला महत्वाची ठरते हे वारली कलेतून प्रत्ययाला येते. संजय देवधर म्हणाले, आदिम कलेतील सौंदर्य शहरी रसिकांपर्यन्त नेतानाच आदिवासी बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जातो असे सांगून नाशिकमध्ये वारली चित्रसंग्रहालय व्हावे असा मानस व्यक्त केला.

प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमधून आदिवासी जीवनशैली, बहारदार निसर्ग, दैनंदिन जीवन, समृद्ध पर्यावरण यांचा प्रत्यय रसिकांना आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनल चिनागी हिने केले. सलिम सय्यद यांनी मान्यवरांचे सत्कार केले. शर्वरी देशपांडे हिने आभार मानले. रात्रीपर्यंत नाशिककर रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन कलेचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

*