Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकसाठी हवे अतिरिक्त पोलीस आयुक्त पद; पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांची भुजबळांकडे मागणी

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहराच्या धर्तीवर नाशिकला अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची गरज आहे. शहर हद्दीचा विस्तार केला तर ग्रामीण हद्दीतील चार पोलीस ठाणे शहरात येतील. त्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त व चार पोलीस उपायुक्त पद शहराला मिळेल. त्यामुळे शहर पोलीस हद्दीचा विस्तार केला जावा, अशी मागणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेची माहिती पालकमंत्री भुजबळ व लोकप्रतिनिधींना दिली. महापालिकेने 200 प्रशिक्षित वॉर्डन दिल्यास सिग्नलवर त्यांना उभे करून वाहतुकीला शिस्त लावता येईल. तसेच, शहरात 12 हजार रिक्षांची गरज असताना सद्यस्थितीत 23 हजार रिक्षा धावत आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. महापालिका व एसटीने शहर बससेवा सुरळीत उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 65 चौक्यांचे नूतनीकरण केले जाईल. डिजिटल पेट्रोलिगंसाठी क्यूआर कोड राबविला जात आहे. तसेच, 10 हटिंग लाईन सुरू केल्या जाणार आहे. जेणेकरुन वेळेवर घटनास्थळी पोहोचता येईल. शहरात पोलिसांकडून 526 कॅमेरे लावण्यात आले आहे.

मात्र, शहराची सुरक्षा अबाधित राखायची असेल तर 4500 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, शहरातील काही पोलीस ठाणे, त्यांच्या वसाहती व निवास्थाने यांचे आधुनिकीकरणासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्मार्ट सिटीत तरतूद करा

स्मार्ट सिटीत नागरिक असुरक्षित असता काम नये. सुरक्षा देण्याचे काम पोलिसांचे आहे. स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी तरतूद केली जावी. सीसीटीव्हीमुळे निगराणीस पोलिसांना मदत होईल.

-आ. छगन भुजबळ, पालकमंत्री

अन्यथा आंदोलन : आ. कोकाटे

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका परिसरात वाहतूककोंडीची समस्या जटील होत असून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. वाहतूककोंडींची समस्या सोडवली नाही तर आंदोलन करू, असा इशारा आ. माणिकराव कोकाटे यांनी दिला. यावेळी 15 दिवसांत हा प्रश्न सोडवू, असे पोलीस आयुक्त नांगरे- पाटील म्हणाले. त्यावेळी दीड महिना घ्यावा, पण हा प्रश्न सोडवा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांना दिले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!