Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मतदार जनजागृतीसाठी ‘नाम मे क्या रखा है’ मोबाईल व्हॅन

Share

नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदार यादयांचे शुद्धीकरण आणि मतदार याद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू आहे. सदर प्रक्रियेचा एक भाग म्हणून मतदार यादीमधील मयत आणि दुबार मतदारांची वगळणी करणे आणि त्या अनुषंगाने मतदार यादी मध्ये दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून नाशिक सिटीझन फोरम या संस्थेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मयत आणि दुबार मतदारांची वगळणी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी बहुतांश मतदारांना त्यांच्या नावातील बदल अथवा मतदार यादीतील अन्य दुरुस्त्यांसाठी कार्यालयात येण्यासाठी वेळ होत नसल्याने त्या दुरुस्त्या तशाच राहून जातात असे सर्वसाधारण मत व्यक्त झाले. त्यामुळे मतदारांनी कार्यालयात येण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचण्याची काही व्यवस्था करता येईल काय यावर देखील सांगोपांग चर्चा झाली.

त्यामध्ये प्रशासनाच्या वतीने काही मोबाईल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यालयीन वेळेनंतर फिरवल्यास व त्या मोबाईल व्हॅनद्वारे मतदारांकडून अर्ज स्वीकारले गेल्यास मतदारांना मतदार यादीतील दुरुस्तीबाबत अर्ज सादर करणे सुकर होईल असे ठरले. या संपूर्ण मोहिमेस काहीतरी नाव असावे अशी देखील चर्चा झाली . रेडिओ मिर्चीचे निवेदक भूषण मटकरी यांनी “नाम मे क्या रखा हैं” अशी टॅगलाईन सुचवले व तेच या मोहिमेचे नाव असावे असे ठरले.

ही अभिनव संकल्पना नाशिक जिल्ह्यातील शहरी भागात मंगळवार 23 जुलै 2019 पासून हाती घेण्यात येत आहे. “नाम में क्या रखा हैं” या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील नाशिक शहरातील चार शहरी विधानसभा मतदारसंघ आणि मालेगाव शहर या मतदारसंघांमध्ये जिल्हा निवडणूक शाखेकडून “नाम में क्या रखा हैं” या वाहनाद्वारे मतदार आणि नागरिकांमध्ये मतदार यादीसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे.

यामध्ये नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील किंवा परिचयातील लोक मयत झालेले असल्यास किंवा एखाद्या मतदाराचे नांव दुबार असल्यास त्याची वगळणी करण्यासाठी या वाहनाद्वारे जागेवरच फॉर्म नमुना क्र. -7 उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबत मृत्यूचा दाखला त्याचबरोबर मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यात मागील साधारणत: एक महिनाभरात 40 हजार पेक्षा जास्त मयत मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर दुबार मतदारांच्या नावांची विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण वगळणी करण्यात येणार आहे. निर्दोष आणि परिपूर्ण मतदार याद्या ही यशस्वी निवडणूक संचलनाचा पाया असल्यामुळे मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि मतदारांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की आपण या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबातील तसेच परिचयातील कुटुंबातील व्यक्ती मृत्यू झालेली असेल, तर अशा मयत व्यक्तीच्या नांवाची मतदार यादी मधुन वगळणी करावी आणि मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण बनविण्याच्या नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मोहिमेस सर्व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

सदर मोहीम ही 30 जुलै 2019 पर्यंत सुरू राहणार असून भारत निवडणूक आयोग दिल्ली यांच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी परिपूर्ण मतदार यादी 19 ऑगस्ट, 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!