Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : गावं पाणीदार करायचंच ?

Share

(पारावर तुळश्या, गुणा, दाम्या, अन सम्या, रंग्या, काश्या हि तरुण मंडळी शांत बसलेली )

गुणा : पाटील …झाल्या बॉ एकदाच्या निवडणुका .. निकालय लागलाय.. पण अजुनबी एकाबी पुढाऱ्याचा पत्ता न्हाय..
पाटलाचा तुक्या : असंच असतंया पोराओ.. आपण फकस्त मतदान करायचं..एकीकडं दुष्काळ पाठ सोडणा..अन पावसाचा सुदिक पत्त्या न्हाय ..

तुळश्या : पण काही म्हणा पाटील औंदा दुष्काळ लय भयाण हाय .. ?
दाम्या : हो खरंच .. पाण्यासाठी लयच अवकळा व्हयाला लागलीया .. माझ्या इहरित एका टिवा सुदा न्हाय. इथं माणसाचं असं हाल हायत तवा लेकरावांनी असणाऱ्या गुराढोराचं काय ?

पाटलाच्या तुक्या : खरय दाम्या ..औंदा दुष्काळानं ..लयच कहर केलाय .. गावं पाण्यासाठी मर मर मरतुया ..
गुणा : मिरीग लागला तरी बी पाऊस पडना … शेत बी पाण्याची वाट पाहत नांगरून ठिवलाया .. (मध्येच तोडत )
सम्या : मया बापानी बी का वावरत नांगर धरला व्हता.. म्या म्हणलं कशाला पाणी नाही काही ..अन बैलांचा जीव घेतुया ..

तुळश्या : अय सम्या… धरणीमाय बी तहानली असलं.. तीबी पाण्याचीच वाट पाहतीया..                                                                पाटलाच्या तुक्या : दरवर्षी हा दुष्काळ वाढतच चाललाय. मागच्या वर्षी निदान दीड दोन किलोमीटरवर पाणी मिळायचं .. पन आता ते बी न्हाय. ?

तुळश्या : यावरीश शासनाचा एकबी टँकर गावाला मिळाला न्हाय. .. पलीकडच्या गावचा पुढारी खाजगी टँकर आणून आपल्याला विकतूया…
काश्या : असं वाटलं नव्हतं कधी कि पाणी इकत घ्यावा लागलं म्हणून… हाताला काम न्हाय का काही न्हाय .. कुठून आणायचे पैसे ?

गुणा : आमचा आजा म्हणायचा आमच्या येळला ह्यो वढा हे भरभरून वाहायचा.. त्यो आता पाडव्यालाच आटून जातोया ..
दाम्या : गुणा, आपुन काय करणार आता ? (पाटलाच्या तुक्या मध्येच बोलत )
पाटलाचा तुक्या : रंग्या, त्यो अमीर खान का कोण ? हाय न तो हिरो ?
रंग्या : हाय ना तात्या ? त्याच काय ?

पाटलाचा तुक्या : त्यानं म्हण दुष्काळी भागात लय झ्याक काम करतुया म्हण ..
सम्या : तात्या ते व्हय …अहो ते पाणी फाऊंडेशनच काम हाय .. जिथं दुष्काळ असलं तिथं काम चालत्यात..
तुळश्या : म्हणजी नक्की काय असत तात्या
पाटलाच्या तुक्या : आर पानी फाऊंडेशन हि एक संस्था हाय ..ज्या ठिकाणी दुष्काळ असलं त्या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांना हाताशी धरून जल संधारणाची काम करत्यात.

गुणा : मग हि चांगली गोष्ट हाय कि, आपल्याबी गावात अशी काम व्हायला पाहिजे. एकतर दुष्काळ हाय.. वरतून काही रोजगार न्हाय.
सम्या : पण गावच्या ग्रामसभेत हा इशय घ्यायला हवा.
पाटलाच्या तुक्या : व्हय समद्या गावांनी या कामासाठी हातभार लावला पाहिजे. तेव्हाचं गाव पाणीदार व्हईल….
दाम्या : न्हायतर दुष्काळ आमचा जीव घेतल्याबिगर राहणार न्हाय..

पाटलाच्या तुक्या : व्हय… पुढाऱ्यांच्या भरवशावर राहिलात तर दुष्काळ आयुष्यभर राहील … आपणच काहीतरी पावलं उचलली पाहिजेल. काय पोरांनो ?                                                                                                                                                                    सम्या , काश्या , रंग्या : व्हय तात्या, गावात झाडांची लागवड कराया पाहिजे, प्रत्येकाने पाणी जपून वापरल पाहिजे, पाणी अडवा, पाणी जिरवा हि योजना गावात राबवायला हवी.

गुणा : म्हणजे पाणी कस थांबलं यासाठी कोणतीही उपाययोजना गावात राबवायची ..गावातला पाण्याचा प्रश्न सोडवायचा …
पाटलाच्या तुक्या : व्हय गुणा, पण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती असतीया त्यामुळे आपण पाणी बचतीवर भर द्यायला हवी.
सगळे : व्हय पाटील… चला सर्वाना सहभागी होण्यासाठी आवाहन करूया, अन गाव पाणीदार करूया..

(शब्दांकन : गोकुळ पवार )

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!