Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांची फौज

Share

नाशिक । विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू होण्यापुर्वीपासून निवडणुक आयोगाच्या सुनेनुसार शहर तसेच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तयारी करत असून मोठ्या नेत्यांच्या सभा, प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून शहर पोलीस व बाहेरील मदत अशी साडेचार हजार अधिकारी, कर्मचार्‍यांची फौज यासाठी तैनात असणार आहे.

जिल्ह्यासह राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार हातघाईवर आला आहे. अवघे पाच दिवस उमेदवारांच्या हातात असून या अखेरच्या दिवसांत प्रत्येक पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या, मोठ्या नेत्यांच्या सभा शहरासह जिल्हाभर होत आहेत. त्यांच्यासाठी बंदोबस्त पोलीसांच्या बंदोबस्ताची विभागणी करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शहरातील सर्व बुथवर तसेच सबंधीत केंद्रावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

२१ ऑक्टोबरला जिल्ह्यात मतदान होणार आहे. शहरात एकुण १ हजार १५४ मतदान बुथ असून यासाठी २५४ इमारतींचा वापर करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी 735 पोलीस कर्मचारी व ५७७ होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरात एकुण ३३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत या केंद्रांसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर शहरभर मतदानाच्या दिवशी काही अनुचीत प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, सहायक निरिक्ष, राखीव दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, होमगार्ड असा एकुण 4 हजार 500 जवानांचा बंदोबस्त असणार आहे.

मतदानानंतर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी शहरात त्या त्या भागात ६ स्ट्रॉगरूम तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणीपर्यंत स्ट्राँगरूमच्या संरक्षणासाठी केंद्रीय सेंट्रल पॅरामीटर मिलीटरी फोर्स (सीपीएमएफ) च्या ४ प्लाटून (४००) जवांनांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील दोन प्लाटून शहरात दाखल झाली आहेत.

या ठिकाणी होणार मतमोजणी
नाशिक पुर्व – मीनाताई ठाकरे स्टेडियम, आडगाव नाका
नाशिक मध्य – दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबईनाका
नाशिक पश्चिम – छ. संभाजी महाराज स्टेडियम, सिडको
देवळाली – विभागीय कार्यालय, नाशिकरोड
इगतपुरी – छ. शिवाजी महाराज स्टेडियम
जनरल स्ट्राँग रूम : वेअर हाऊस अंबड

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!