Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

सिन्नर : एका विश्रांतीनंतर चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश; कोकाटे यांचा ऐतिहासिक विजय

Share

अजित देसाई : व्यक्तिकेंद्रित राजकारणाची परंपरा लाभलेल्या सिन्नरमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीची निवडून येण्याची कुवत महत्त्वाची मानली जाते. यासोबतच पराभूत झालेला उमेदवार पुन्हा निवडला जात नाही, हा इतिहास विधानसभेच्या निवडणुकीबाबत सिन्नरला सांगता येईल. सलग तीन टर्म आमदारकी उपभोगलेले कोकाटे यांचा गेल्या निवडणुकीत मावळते आमदार राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला आणि त्यांच्या विजयाची शृंखला खंडित करण्याबरोबरच चौथ्या खेपेला आमदार निवडून न येण्याचा इतिहास देखील अधोरेखित झाला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत या इतिहासाला तिलांजली देण्याचे काम कोकाटे यांनीच केले आहे. एका विश्रांतीनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार वाजे यांना आव्हान देत कोकाटे यांनी विजयश्री संपादन केली. दोन हजार मतांच्या निसटत्या फरकाने का होईना त्यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल.

आक्रमक वृत्तीचे मानले जाणारे माणिकराव कोकाटे जिल्ह्याच्या राजकारणात पंचवीस वर्षांपासून सक्रिय आहेत. माजी मंत्री तुकाराम दिघोळे याच्या विरोधात शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणार्‍या कोकाटे यांनी दुसर्‍या खेपेला शिवसेना, तिसर्‍यांदा काँग्रेसकडून विधानसभा गाठली होती. चौथ्यांदा मात्र वाजे यांनी त्यांच्या विजयाचा वारू रोखला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष बदलांचे वर्तुळ पूर्ण करणार्‍या कोकाटे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी करत अपक्ष म्हणून नशीब आजमावले होते.

या निवडणुकीत सिन्नर वगळता उर्वरित ठिकाणी त्यांना अपेक्षित मतांचा जोगवा जनतेकडून मिळाला नसला तरी सिन्नरची आघाडी त्यांच्या विधानसभा प्रवेशाची नांदी ठरली. पक्ष पातळीवर सिन्नरच्या राजकारणाला स्थान दुय्यम असले तरी विधानसभेची निवडणूक लढवताना लोकसभेप्रमाणे अपक्ष म्हणून सामोरे न जाता एखाद्या पक्षाची साथ घ्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यादृष्टीनेच कोकाटे यांनी युती व आघाडीच्या समीकरणांवर लक्ष ठेवत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. भाजपकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा झाल्यास जिल्हा परिषद सदस्य असणार्‍या मुलगी सीमंतिनी हिला सहजपणे उमेदवारी मिळेल, असा अंदाज कोकाटे यांनी बांधला होता. मात्र, अनपेक्षितपणे युतीची घोषणा झाल्यावर कोकाटे यांनी राष्ट्रवादीला जवळ केले.

अर्थात यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पुढाकार निर्णायक मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांनी आमदार वाजे यांना कोकाटे यांच्या विरोधात पाठबळ दिले होते हे सर्वश्रुत आहे. नंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे असणार्‍या वाजे यांच्याकडून भुजबळांना अपेक्षित मदत न मिळाल्याने व राजकीय समीकरणांच्या नव्या जुळवनीसाठी भुजबळ यांनी कोकाटे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीत पराभवाचे धनी झालेल्या कोकाटे यांनी सिन्नरमधल्या निर्णायक आघाडीच्या बळावर पुन्हा विधानसभेची तयारी आरंभली होती. राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षाने सिन्नरमधून त्यांची उमेदवारी जाहीर करतानाच भुजबळ यांच्यावर देखील कोकाटे यांच्या विजयासाठी जबाबदारी सोपवली होती.

पक्ष पाठबळ मिळाल्याने कोकाटे यांचा प्रचाराचा भार काहीसा हलका झाला. तर सिन्नरचा पाणी प्रश्न, उद्योगाची झालेली अवस्था या मुद्द्यांना हात घालत कोकाटे यांनी विरोधकांना नामोहरण करण्याची खेळी खेळली. असे असले तरी इतिहास बदलणार नाही, असा अंदाज राजकीय निरीक्षकांचा होता. भुजबळ यांच्या मदतीने विधानसभेची निवडणूक लढवणार्‍या कोकाटे यांना वाजेंना रोखता येणार नाही, असा अंदाज या निवडणुकीत चुकला आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोकाटे चौथ्यांदा विधानसभेची पायरी चढले.

कोकाटे यांचा हा विजय निसटता असला तरी खडतर होता असेच म्हणावे लागेल. कारण राज्यातील लक्षवेधी लढत म्हणून सिन्नरकडे पाहिले जात होते. मागचा इतिहास तपासला तर वाजे पुन्हा आमदारकी शाबूत राखतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र, सिन्नर शहरासह टाकेद जिल्हा परिषद गटाने दिलेली निर्णायक आघाडी कोकाटे यांना विजय समिप घेऊन गेली आहे.

यांचे भंगले स्वप्न
माजी आमदार सूर्यभान गडाख, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सलग तीन पंचवार्षिकला सिन्नरचे प्रतिनिधित्व विधानसभेत केल्याचा इतिहास आहे. गडाख यांना चौथ्यांदा विधानसभेत जाण्यापासून दिघोळे यांनी रोखले होते. त्याच दिघोळे यांना कोकाटे यांनी पराभूत करत विधानसभा गाठली होती. पराभूत झाल्यानंतरही दिघोळे यांनी कोकाटे यांना टक्कर दिली होती. तर ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांना पराभूत करत कोकाटे तिसर्‍यांदा आमदार बनले होते. इतिहासाची होणारी पुनरावृत्ती राजाभाऊ वाजे यांच्यासोबतच्या लढतीने पुन्हा झाली. आणि सलग चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचे कोकाटे यांचे स्वप्न भंगले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र हा इतिहास रोखला जाऊन आमदार वाजे यांना कोकाटे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!