Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वृक्षलागवड मोहिमेला निवडणुकीचा अडथळा

Share

नाशिक । प्रतिनिधी
33 कोटी वृक्षलागवडीचे लक्ष घेऊन महाराष्ट्र हिरवागार करण्याच्या उद्दिष्टाला आगामी विधानसभा निवडणुकीचा अडथळा निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या कामाला मनुष्यबळ लागणार असल्याने येत्या 15 ऑगस्टपर्यंत वृक्षारोपणाचे निदान 75 टक्के लक्ष पूर्ण करा, असे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व विभागाना दिले आहे. नाशिक जिल्ह्याला दोन कोटी चार लाख 97 हजार वृक्षलागवडीचे ध्येय देण्यात आले होते. त्यापैकी सर्व विभागांनी मिळून 87 लाख 43 हजार वृक्ष लावले आहेत.

औद्योगिकीकरणात अव्वल असलेला महाराष्ट्राला हिरवेगार करण्यासाठी मागील पाच वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीची मोहीम वनमंत्री मुनगंटीवार यांनी हाती घेतली होती. यंदा 2019-20 या वर्षात राज्यभरात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले होते. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. मात्र, राज्यभरात पावसाचे आगमन लांबल्याने वृक्षारोपणाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले.

जून महिना संपूर्ण कोरडा गेल्याने वृक्षारोपणासाठी अनुकूल वातावरण नव्हते. तसेच जुलैमध्येही समाधानकारक पाऊस नसल्याने वृक्षारोपण मोहिमेने अद्याप गती घेतली नसल्याचे पहायला मिळते. नाशिक जिल्ह्याला दोन कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय देण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाभरात एक कोटी 96 हजार खड्डे खोदण्यात आले आहे. मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने दिलेल्या एकूण उद्दिष्टापैकी 50 टक्के वृक्षलागवड देखील पूर्ण होऊ शकली नाही.

सर्व विभाग मिळून 87 लाख 43 हजार 223 वृक्षांची लागवड होऊ शकली आहे. त्यापैकी सर्वाधिक लागवड ही वनविभागाने केली आहे. वनविभागाने 51 लाख 35 हजार वृक्षारोपण केले आहे. तर उर्वरित विभागांनी 36 लाख वृक्षांची लागवड केली आहे. पावसाअभावी वृक्षारोपण मोहीम अपेक्षित वेग घेऊ शकली नाही.

त्यात आता विधानसभा निवडणुकीची लगीन घाई सुरू आहे. निवडणूक आयोगाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टनंतर निवडणुकीचे कामांना सुरुवात होईल. ते लक्षात घेता वनमंत्रालयाने येत्या 15 ऑगस्टपर्यंत दिलेल्या उद्धिष्टापैकी 75 टक्के वृक्षलागवड करावी, असे पत्र सर्व विभागांना जारी केले आहे. पावसाचे कोलमडलेले नियोजन व निवडणुकीची तयारी या मुळे यंदा वृक्षलागवड मोहिमेला खो बसल्याचे पहायला मिळत आहे.

         विभागांनी केलेली वृक्षलागवड
वनविभाग –                          51 लाख 35 हजार
सामाजिक वनीकरण विभाग – 16 लाख 90 हजार
ग्रामपंचायत –                        7 लाख 1 हजार
कृषीविभाग –                       1 लाख 41 हजार
शिक्षण विभाग –                    50 हजार 178
महापालिका –                      34 हजार 437
जलसंधारण विभाग –             28 हजार 616

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!