Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दुष्काळी परिस्थितीत टोमॅटो उत्पादकांना अच्छे दिन 

Share

वैभव पवार । खामखेडा : दुष्काळी परिस्थितीत खामखेडा सह कळवण तालुक्यातील गिरणा व पुनद नदी काठावरील गावांमधील शेतकऱ्यांनी साधारणता दिड ते दोन हजार हेक्‍टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे.

या वर्षी दुष्काळाने उत्पादनात घट झाल्याने सध्या टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. गेल्या दोन हंगामातील हा सर्वाधिक भाव असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना टोमॅटो या पिकांने दिलासा मिळाला आहे.

यावर्षी प्रचंड दुष्काळ असून थेंब थेंब पाण्यासाठी अख्खा महाराष्ट्र कासावीस झाला आहे.मात्र कळवण तालुक्यातील चणकापूर धरण व पुनद प्रकल्पयातून गिरणा नदी व पुनद नदीस आवर्तन येते.त्यामुळे या परिसरातील नदीकाठावरील ब्रिटिश कालीन बंधारे,पाझर तलावात,तसेच नदी काठावरील विहिरींना शाश्वत पाणी उपलब्ध असते.त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या विहिरींना या वर्षी अतिशय तीव्र दुष्काळ असताना देखील थोडेफार पाणी टिकून आहे.

त्यामुळे या परिसरात चालू वर्षी टरबूज,टोमॅटो व हिरवी मिरची शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून टोमॅटोचा उत्पादक शेतकरी अडचणीत होता. कवडीमोल दराने टोमॅटो विकला गेल्याने शेतकरी या पिकामुळे आर्थिक अडचणीत सापडत असे. मात्र यावर्षी देखीलखामखेडा, पिळकोस, बगडू, बेज, भादवण, विसापूर, कळवण, मानुर, पाळे, अभोना, कळमथे, देसराणे, मोकभनगी, नाकोडे, खेडगाव यासह गिरणाकाठ व पुनद नदीच्या काठावरील गावांमध्ये शेतकरी अल्पशा पाण्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने टोमॅटो लागवड केली आहे. एकरी ४०  ते ५०  हजार रुपये खर्च करत शेतकऱ्यांनी या वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या टोमॅटोची सध्या तोडणी सुरू आहे.

धरणाचा परिसर सोडला तर इतर भागात प्यायला देखील पाणी नसल्याने व सर्वत्र टोमॅटोचे उत्पन्न घटल्याने तसेच तीव्र उन्हाने टोमॅटोची क्षेत्रात कमालीची घट,फळधारणा होत नसल्याने उत्पादनातील घट झाल्याने सध्या या हंगामात सुरू असलेल्या टोमॅटोला मागणी वाढली आहे.सध्या बाजारात टोमॅटो सरासरी २० किलो कॅरेटला पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे जेवढया शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात चांगली काळजी घेतली आहे, अशा शेतकऱ्यांच्या हाती पैसा लागत आहे.

टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकात एकरी सरासरी बाराशे ते पंधराशे कॅरेट टोमॅटो उत्पादन मिळते.सध्या चांगला बाजारभाव असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

यावर्षी तीव्र उष्णतेमुळे अनेकांना टोमॅटोच्या बागा तयार करता आल्या नाहीत.परिणामी लागवड क्षेत्रात घट झाली. त्यामुळे उत्पादन व मागणीत तफावत निर्माण झाल्याने बाजार भाव वाढले आहेत.                                                                                               ——–-भाऊसाहेब शेवाळे, टोमॅटो उत्पादक शेतकरी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!