Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

…अन् पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोडका संसार झाला सोन पाखरांचा

Share

वाजगाव । शुभानंद देवरे : पोलिसांची समझदारी व गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे उध्वस्त होणारे दोन संसार मार्गाला लागल्याची घटना गुरुवारी वाजगाव येथे घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे गुरुवार दि. २३ रोजी वाजगाव येथील ताई माळी या आदिवासी कुटुंबातील मुलीचा विवाह सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील अजय गायकवाड ह्या मुलाशी होणार होता. परंतु अजयचा साडेतीन वर्षापूर्वी प्रियंका गायकवाड हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता. हे जोडपे गुंजाळनगर येथे रहात होते. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. अजयच्या आई वडीलांनी त्याच्या इच्छेविरूद्ध त्याचा विवाह वाजगाव येथील ताई माळी ह्या मुलीशी गुरूवार दि. २३ रोजी करण्याचे नक्की केले.

वाजगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत हा विवाह होणार होता. वधू व वर पक्षाने लग्नाची जोरदार तयारी सुरू केली. हया नियोजित विवाह सोहळयाची कुणकुण प्रथम पत्नी प्रियांकाला लागली. गुरूवारी सकाळी तिने देवळा पोलिस ठाण्यात येउन सारी हकीकत कथन केली व पोलिसांची मदत मागितली.

पोलिसांनी त्वरीत कारवाई करीत सरस्वतीवाडी येथे जाउन नवरदेव अजय यास ताब्यात घेतले, व वाजगावच्या पोलिस पाटील सौ. नीशा देवरे यांना याबाबत माहिती दिली.

सौ.देवरे यांनी वधूच्या नातेवाईकांना वर पक्षाने केलेल्या फसवणुकीची वार्ता दिली. तोपर्यंत लग्नमंडप, जेवणावळ आदी लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. सर्व जण वऱ्हाडी मंडळी येण्याची प्रतिक्षा करीत होती. त्यातच आलेल्या हया वार्तेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. सर्वांनी देवळा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळले.

वाजगाव ग्रामपंचायत उपसरपंच दिपक देवरे, सामाजीक कार्यकर्ते विनोद देवरे, संजय गायकवाड, अमोल देवरे, प्रदिप देवरे, राकेश देवरे, विलास भामरे, पंकज अहेर, बापू अहेर आदी वाजगाव व सरस्वती वाडी येथील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून यातून मार्ग काढला.

वर पक्षाने लग्नासाठी झालेल्या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. अजयने प्रियांकाची माफी मागितल्यानंतर अजयला पोलिसांनी मुक्त केले. हे जोडपे आनंदाने मार्गस्थ झाले.

वाजगाव येथे वधूपक्षाकडील नातेवाईक मंडळी मात्र चिंतेत पडली होती. वधूच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. गावात एका पोल्ट्री फार्मवर कामाला असलेल्या रविंद्र आंबेकर ह्या युवकाला गावकऱ्यांनी लग्नासाठी राजी केले.

गावकऱ्यांनी (मेहदर, ता.कळवण ) येथे त्याच्या आई वडीलांशी संपर्क साधून त्यांना सर्व माहीती देत ह्या लग्नासाठी त्यांचा होकार मिळवला व नातेवाईकांसह वाजगाव येथे लग्नसमारंभासाठी  येण्याचे आमंत्रण दिले.

पोलिस ह्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेउन होते. वऱ्हाडी मंडळी आल्यानंतर अखेर सायंकाळी रविंद्र व ताई यांचे लग्न धुमधडाक्यात साजरे झाले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. पोलिसांची समझदारी, वरपक्षाने मोठ्या मनाने विवाहास दिलेली मान्यता व गावकऱ्यांनी घेतलेले परिश्रम यामुळे एका मुलीचा संसार मार्गाला लागला……सौ. निशा देवरे (पोलिस पाटील, वाजगाव)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!