कानमंडाळे येथे सामाजिक मूल्ये जोपासत बाल आनंद मेळावा उत्साहात

0

वडाळीभोई : सगळीकडे गणेशोत्सवाचे लगबग असल्याने ग्रामीण भागातही गणेशोत्सव थाटामाटात साजरा होताना दिसून येत आहे. वडाळीभोई जवळील कानमंडळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांचा आगळावेगळा भाजीबाजार महोत्सव भरविला. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य, गणिती मूलभूत क्रिया, स्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, बळी राजा विषयी सन्मान, साफसफाई, सामाजिक बांधिलीकी यासारखे अनेक मूल्य नकळत जोपासली जातात.

या शाळेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना विविध भाज्या घेऊन बसण्यास सांगितले. कुणाच्या हातात भाजीपाला तर कुणाच्या हातात फळांच्या टोपल्या कुणाच्या हातात खाऊचे पूडे तर काहींच्या हातात स्टेशनरी सामान अाढळून आले. सर्व परिसर विद्यार्थी विक्रेत्यांच्या आवाजाने दणाणून निघाला होता. गणेशोत्सव २०१८ च्या निमित्ताने शाळेत भरविण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाजाराने गावात आनंदाचे वातावरण तयार झाले होते.

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी चांदवड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. बी. टी. चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कानमंडाळेचे पदाधिकारी, गावातील मान्यवर ग्रामस्थ व पालक हे बहुसंख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
यानंतर शालेय परिसराची, पोषण आहार साठ्याची खोली तसेच पोषण आहाराच्या दर्जाचीही पाहणी केली व सर्व घटकांविषयी समाधान व आनंद व्यक्त केला.

शाळेने भरविण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यामध्ये साधारण १० ते १२ हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे शिक्षक महेंद्र आहेर यांनी सांगितले .या बालआनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*