नाशिकचे भाविक इच्छितस्थळी पोहोचले

0
नाशिक | दि. २० प्रतिनिधी- उत्तराखंडमध्ये झालेल्या भुस्खलनामुळै चारधाम यात्रा विस्कळीत झाली. या यात्रेसाठी नाशिकहून गेलेल्या २२२ भाविकांचा समावेश असून हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचे यात्रा कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले. यातील १०८ भाविक हे यात्राकंपनीमार्फत यात्रेला गेले आहेत तर ११४ भाविक खाजगीरित्या यात्रेला गेल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली. यातील काही भाविक परतीच्या मार्गावर असून दोन तीन दिवसात रस्ता सुरळित होउन इच्छितस्थळी पोहचले असल्याचेस्थानिक प्रशासनाने सांगितले.

ॠषीकेश बद्रीनाथ महामार्गावर हत्तीपर्वत येथे भूस्खलन झाल्याने येथे भाविक अडकून पडले आहे. दरम्यान या भूस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आज नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सर्व टूर मॅनेजरशी संपर्क साधून भाविकांच्या सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली.

तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्‍वासनही यावेळी देण्यात आले. नाशिक येथील श्रीराम यात्रा कंपनीमार्फत ९६ भाविक चारधाम यात्रेसाठी गेले असून हे सर्व भाविक गंगोत्री येथे सुरक्षित असल्याचे कंपनीचे संचालक रामावतार चौधरी यांनी सांगितले. २७ मे रोजी या भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

चौधरी यात्रा कंपनीमार्फत एकूण ५५ भाविक चारधाम यात्रेसाठी गेले असून यातील १० भाविक नाशिक जिल्ह्यातील आहेत. हे सर्व भाविक सुरक्षित असल्याचे यात्रा कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे. केसरी टूर्सद्वारे नाशिकच्या दिंडोरीरोडवरील वृंदावननगर येथील रहिवासी संजय वाबळे (वय ५८) आणि रोहिणी वाबळे (वय ५५) हे चारधाम यात्रेसाठी गेले असून हे भाविक १४ मे रोजी मुंबईहून रवाना झाले आहेत. सध्या हे भाविक सीतापूर येथे आहेत.

यात्रेच्या नियोजनानुसार हे भाविक २६ मे रोजी मुंबईत परतील असे नाशिक ऑफिसच्या रेणुका देशमुख यांनी सांगितले. निफाड येथील बापू गीते (वय ३३), शकुंतला गीते (वय ४९),अशी या भाविकांची नावे असून त्यांच्यासोबत चिंधू नेताळकर या सहयात्रेकरू आहेत. ११ मे रोजी हे भाविक नाशिकरोड येथून रेल्वेने बद्रीनाथ, केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले. हे भाविक केदारनाथ येथे पुढील यात्रेसाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या हे भाविक केदारनाथपासून ५० किलोमीटर अंतरावर असून सर्वजण सुरक्षित असल्याचे बाबा गीते यांनी सांगितले. मालेगाव येथील खासगीरित्या दोन भाविक यात्रेसाठी रवाना झाले आहेत. मनोहर देसले (वय २८), सुमन देसले (वय ५३), अशी या भाविकांची नावे आहेेत.

त्यांच्यासोबत इतरही ७ भाविक आहेत. १२ मे रोजी हे भाविक चाळीसगाव येथून ॠषीकेशकडे रवाना झाले. येवला येथील ११० भाविक खासगीरित्या या यात्रेसाठी रवाना झाले असून हे भाविक घटनास्थळापासून १०० किलोमीटर अंतरावर आहेत. केसरी, श्रीराम, चौधरी या यात्रा कंपनी व्यतिरिक्त नाशिकमधील इतर यात्रा कंपन्यांशी संपर्क साधला असता त्यांच्या ट्रॅव्हल्समार्फत चारधाम यात्रेसाठी कोणीही भाविक नाशिकमधून गेले नसल्याचे सांगण्यात आले.

सर्व भाविक सुरक्षित
आमचे सर्व भाविक गंगोत्री येथे असून सर्व भाविक सुरक्षित आहेत. २७ मे रोजी आमचा परतीचा प्रवास सुरू होईल.
रामावतार चौधरी, संचालक, श्रीराम यात्रा कंपनी
नाशिकमधील भाविक आमच्या सोबत आहेत. सर्व भाविक सीतापूर येथे आहेत. सर्व भाविक सुरक्षित असून हे सर्व भाविक २६ मे रोजी मुंबईत परततील.
रेणुका देशमुख, केसरी, टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स
माझे आई आणि भाऊ या यात्रेसाठी गेलेले असून ते केदारनाथपासून ५० किलोमीटर अंतरावर सुरक्षित आहेत. दोन, तीन दिवसात ते परतीचा प्रवास सुरू करतील.
बाबा गीते, निफाड

LEAVE A REPLY

*