कृषी महोत्सवात एक कोटी 85 लाखांची उलाढाल

0

नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे आयोजित ‘नाशिक जिल्हा कृषी महोत्सव-2019’मध्ये एक लाख पंचवीस हजार ग्राहकांनी भेट दिली.पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात एक कोटी 85 लाखांची उलाढाल झाली.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने पाच दिवस येथील ईदगाह मैदान गोल्फ क्लब येथे ‘नाशिक जिल्हा कृषी महोत्सव-2019’ चे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात 246 स्टॉल विविध कंपन्या,शेतकरी गट,उद्योजक यांनी लावले होते.यापैकी 25 स्टॉलवर सेंद्रिय मालाची विक्री झाली तर 30 स्टॉलवर बिगर सेंद्रिय मालाची विक्री झाली.एक लाख 25 हजार ग्राहकांनी या महोत्सवाला भेट दिली.पाच दिवसांच्या या महोत्सवात खरेदी-विक्रीतून एक कोटी 85 लाखांची उलाढाल झाली.आज(दि.11)समारोप कार्यक्रमात विविध शेतकरी गट तसेच स्टॉलधारक या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा कृषी महोत्सवामध्ये शेतकरी मेळावा,सेंद्रिय शेतीचा पुरस्कार व प्रमाणीकरण,शेतीमध्ये प्लास्टिकचा वापर,थेट पणन विषयी मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल,जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्विता,शेत मालाचे ग्रेडिंग पॅकिंग,शेतीचे व्यवस्थापन,शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योग,निर्यात शेती विषयी माहिती अशी वैशिष्टये यां महोत्सवाची होती.

समारोप कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे,तालुका कृषी अधिकारी मालेगाव गोकुळ आहिरे, तंत्र अधिकारी जितेंद्र शहा,उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी,गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*