Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हरीहर गडावर जाताय? सावधान..! अबब..केव्हढी ही गर्दी

Share

नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्यावर पर्यटकांच्या गर्दीचा ओघ वाढला आहे. अवघ्या 100 पर्यटकांना एकाच वेळी जाता येणार्‍या गडावर रविवारी (दि.23) अचानक दोन हजार पर्यटकांनी गर्दी केल्यामूळे सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला होता. पायर्‍यांवरील या तरुणाईची गर्दी बघितल्यास कुणालाही आश्चर्य आणि भीती वाटेल अशी परिस्थिती होती. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून त्त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी गिर्यारोहकांनी केली आहे.

समुद्रसपाटीपासून हरीहर गड 3 हजार 674 फूट उंचीवर आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत हा गड येतो. इंग्रजांच्या काळात अधिकार्‍यांचेही डोळे दिपवणारा असा हा गड आहे. आजही या गडाची सौंदर्य आहे त्याच स्थितीत टिकून आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची रिमझिम सुरु झाली की, या गडाला हिरवाईची चादरच पांघरली जाते. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात.

त्र्यंबक परिसरात पावसाची रिमझिम सुरु असल्याच्या वार्तांनंतर रविवारी काही हौशी पर्यटकांनी सुट्टी घालविण्यासाठी हरीहर गड डेस्टिनेशन निवडले होते. अचानक वाढलेल्या गर्दीमूळे काहीसा गोंधळ याठिकाणी झालेला दिसून आला. गडावर चढून जाण्यासाठी आणि गडावरून परतण्यासाठी एकमेव रस्ता असल्यामूळे दोन्ही बाजूंनी पर्यटकांच्या गर्दीचा ओघ वाढता राहिला होता.

यामूळे प्रचंड गर्दीचे फोटो स्मार्टफोनधारी नेटकर्‍यांनी काढत ते समाजमाध्यमांत पसरवले. याठिकाणी वनविभागाकडून पर्यटकांना आवर घालण्यासाठी तसेच सुरक्षिततेसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. फोटातील गर्दी बघून गोंधळ उडाला असता तर मोठी हानी याठिकाणी झाली असती असेही अनेक अभ्यासकांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

गडाच्या पायथ्याशी निरगुडपाडा हे दोनशे ते अडिचशे लोकवस्तीचे गांव आहे. या गावातील ग्रामस्थांना पर्यटकांसाठी जेवण, पाणी, मक्याचा भुट्टा भाजून देण्यासाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, दिवसेंदिवस पर्यटकांच्या गर्दीमूळे येथील सुविधा अपुर्‍या पडत आहेत. रविवारी अचानक झालेल्या गर्दीमूळे अनेक पर्यटकांना उपाशीच परतावे लागले. त्यामूळे प्रभावी उपाययोजना राबवून याठिकाणी टुरिस्ट डेस्टिनेशनचे निकष लावत रोजगारवृद्धी होऊ शकते यादृष्टीकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत असेही असेही सांगितले जात आहे.

…तर ती ठिकाणं बंद करावी

एकाच ठिकाणी वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमूळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. अपघात शक्यतोवर उतरतानाच घडतात. त्यामूळे एकमेव ये-जा करण्यासाठी मार्ग असलेली ठिकाणं पर्यटनासाठी काही दिवस बंद करण्यात आली होती. त्या धर्तीवर अपघात टाळण्यासाठी विचारा केला जावा.
-सुदर्शन कुलथे, गिर्यारोहक अभ्यासक, नाशिक

हौशी पर्यटकांनो काळजी घ्या

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळांवर कमालीची गर्दी हौशी पर्यटकांची होते. अतिआनंदाच्या भरात स्वतःची सुरक्षा अनेकजण विसरतात त्यामूळे अपघातांना सामोरे जावे लागते. कुठेही जा, आधी स्वतःची काळजी घ्या. माहिती नसेल त्याठिकाणची माहिती करून घ्या.   -राहुल सोनवणे, गिर्यारोहक अभ्यासक, नाशिक

‘देशदूत’ची भुमिका
हरिहर किल्ल्याची रचना अवघड असली तरी आजपर्यंत हरिहर पायरी मार्ग तसेच गडमाथ्याहून पडल्याने अपघात झाला नाही. तरी सोशल मिडियामधून पायरी मार्गावर होणारी गर्दीची भीषण वास्तवता समोर येत आहे. त्यामुळे जलद गतीने उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, वनाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, दुर्ग अभ्यासक, तज्ञमंडळी, गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू टीम, काही तज्ञ गिर्यारोहक यांनी संयुक्त हरिहर किल्ल्यासाठी उपाययोजना कराव्यात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!