भाग ३ । माझा प्रवास : अमेरिका विमानतळ आणि न्यूजर्सी शहर
Share

नाशिक : १८ जून २०१९ आम्ही भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १:३० वाजता म्हणजेच न्यूजर्सीच्या नेवार्क लिबर्टी आतंरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. विमानातून एरोब्रिजद्वारे दाखल झालो. ते इमिग्रेशन विभागाकडे येथे खूप प्रचंड गर्दी जमलेली होती. मंदिरात आपण ज्याप्रकारे दर्शन करून झाल्यावर आपण प्रदक्षिणा घालतो.
अगदी तशाच प्रकारे आम्हाला फिरून जावे लागत होते. अशा एकूण ८ रांगा होत्या. पण अखेर नंबर लागला सर्वप्रथम येथे संगणकाद्वारे प्राथमिक माहिती तपासण्यात आली. त्यानंतर हातांचे ठसे घेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अखेर आमच्या व्हिसावर अमेरिकेत दाखल झाल्याचा शिक्का बसला.
त्यानंतर कस्टम क्लिअरन्स विभागातुन सर्व बॅग्स परत घेत विमानतळाच्या परिसरावर नजर फिरवली. आता दादाला कधी एकदा बघतो असं झालं होत. कारण एकमेकांना तब्बल एका वर्षानंतर भेटणार होतो. अखेर आमची प्रतीक्षा संपली अचानक एक हाक आली सलिल ! वाटलं दादाने मला हाक मारली हे कदाचित स्वप्न असावं ! म्हणून माझ्या मनाची खात्री करून घेण्यासाठी समोर बघितलं तर खरंच दादा समोर उभा होता. सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटत होत.
मग विमानतळाच्या बाहेर आलो. कॅबमधून दादाच्या राहत्या घराच्या दिशेने निघालो. साधारणपणे २ तासांनंतर दादाच्या न्यूजर्सीतील पार्लीन भागातील क्रेस्ट व्हियू अपार्टमेंट मध्ये पोहोचलो. येथे एकूण सहा अपार्टमेंट्स होत्या. मनात अचानक एक प्रश्न पडला ७० दिवस आपण करावं तरी काय ?
सोसायटीत एक नजर मारल्यावर खूप फरक जाणवला. वाहने उभी करण्यासाठी काही नंबर्स आखलेले होते. आपल्याला जो नंबर दिलेला आहे. तिथेच प्रत्येकाने आपली वाहने उभी करायची होती. घरात निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र कचरापेटी होती. लहान मुलांना बागडण्यासाठी स्वतंत्र बगीचा होता.
न्यूजर्सी शहर : भारतात ज्याप्रमाणे राज्ये आणि जिल्हे अशी गणना केली जाते. यालाच अमेरिकेत स्टेट आणि कौंटी असे म्हणतात. हे शहर अमेरिकेतील प्रमुख शहरांपैकी एक आहे. येथे सर्वत्र आजूबाजूला प्रचंड हिरवळ असल्यामुळे याला गार्डन स्टेट असे म्हणतात. येथील सर्व घरे ही लाकडाची आहेत. घरांची छपरे ही उतरती आहेत. सर्व रस्ते हे सुंदर आणि निटनेटके आहेत. ट्रेंटन ही न्यूजर्सीची राजधानी आहे. येथे इंग्रजी सोबतच स्पॅनिश, कोरियन, फ्रेंच अरेबिक या इतर प्रमुख भाषा आहेत.
ईस्टर्न गोल्डफिंच हा प्रमुख पक्षी आहे. ब्रुक टौच हा प्रमुख मासा आहे. शहराचा झेंड्याचा रंग बफ एन्ड ब्लू आहे. आर्थिक दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. स्टेट रूट मार्कर ४७ आहे. या शहराची सीमा न्यूयॉर्कच्या उत्तर आणि पूर्व पासून ते दक्षिण आणि दक्षिण पूर्व अटलांटिक महासागर पासून पेन्सिलवहिनिया पासून पश्चिमेस डोलावेअर पर्यंत आहे. या शहराची लोकसंख्या ८९,४४,४६९ आहे. येथील ७०% लोक इंग्रजी भाषा बोलतात तर १६% स्पॅनिश तर २.७ भारतीय भाषा बोलतात.
-सलिल परांजपे, देशदूत नाशिक