ऑनलाइन बिंगो खेळवणाऱ्या आणि खेळणाऱ्या तिघांना अटक

0

नाशिक । ऑनलाइन बिंगो खेळवणार्या आणि खेळणार्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी कैलास जोगेंद्रप्रसाद शहा (28, रा. दत्तचौक, गंगापूर रोड) हा मुख्य संशयित असून तो नाशिक शहरात ऑनलाइन बिंगो चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

युवावर्ग या जुगारामुळे उध्वस्त होत असताना याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय बनला आहे. नाशिकरोड परिसरात बिंगोच्या पैशांवरून दोन गटात वादही झाले. तरीदेखील पोलिसांकडून बिंगो जुगार खेळवणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, शनिवारी (दि.15) गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करीत तिघांना अटक केली आहे. कैलास शहा हा शहरात बिंगो आणि रौलेट जुगार ऑनलाइनरित्या चालवत असल्याचे समोर आले असून तो मुख्य सुत्रधार असल्याचे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सांगितले.

तसेच त्याच्यामार्फत बिंगो खेळणार्या संकेत शिवाजी शेलार (22, रा. वावरेलेन, शालिमार) आणि सुरज पंढरीनाथ उगलमुगले (24, रा. विद्यानगर, मखमलाबादरोड) या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, दुचाकी असा 1 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, हवालदार रविंद्र बागुल, वसंत पांडव, पोलीस शिपाई स्वप्निल जुंद्रे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*