Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

रेशनची निकृष्ट तूरडाळ ग्राहकांनी नाकारली; दुकानांमध्ये हिरवी, जाडीभरडी डाळ

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
धान्य आणि डाळीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी रेशनच्या दुकानावर चनाडाळ व तूरडाळाची विक्री केली जात आहे. चनाडाळ 45 रुपये किलो तर तूरदाळ 55 रुपये किलो दराने दिली जात आहे. असे असले तरी रेशनवर दिली जाणारी तूरडाळ ही जाडी व हिरवट असून डाळीचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे रेशनची तूरडाळ खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. रेशन दुकानदारांकडे तूरडाळ तशीच पडून आहे.

बाजारात डाळीचे भाव वाढले असून तूरडाळ शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. अगोदरच दुष्काळाने पिचलेल्या नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत होती. ते बघता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून रेशन दुकानावर स्वस्त दरात तूरडाळ, चनाडाळ उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा पुरवठा विभागाच्या मागणीनुसार 1400 क्विंटल तूरडाळ व 2600 क्विंटल चनाडाळ उपलब्ध करून देण्यात आली.

12 जूनला डाळींची मागणी करण्यात आली होती. 10 जुलैला डाळींचा साठा जिल्हा पुरवठा विभागाला मिळाला. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम अशा सुमारे 6 लाख शिधापत्रिकाधारकांना होईल, असा अंदाज जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी वर्तवला होता. पण रेशनवर दिली जाणारी तूरडाळ जाड आणि हिरवट आहे. त्यात वाटाणे असल्याचीही चर्चा होत असून ही तूरडाळ बाजारातील फटका तूरडाळ या दर्जेदार डाळीच्या दरात अतिशय निकृष्ट असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.

त्यामुळे स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देऊनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रेशनवरील डाळीला मागणीच येत नाही. ग्राहकांकडून तिला पसंतीच दिली जात नसल्याने जिल्ह्यासाठी गत महिन्यात आणि चालू महिन्यात मागणी केलेली डाळ मोठ्या प्रमाणावर दुकानदारांकडे पडून आहे.

ही डाळ विक्रीसाठी पुरवठा खात्याकडून रेशन दुकानांवर दबाव टाकला जात आहे. मात्र नागरिक डाळ घेत नसल्याने रेशन दुकानदारांचाही नाईलाज झाला आहे. दुकानदारांकडे डाळसाठा तसाच पडून आहे.

सण-उत्सवांच्या काळात या डाळींचे दर गगनाला भिडत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रेशन दुकानातून 55 रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण ही डाळ खराब असल्याने ती घेण्यास ग्राहकांचा नकार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे ती पडून आहे.
– निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!