पीकपेरा अहवालाची मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी केली जाणार

0

नाशिक । क्षेत्रीय स्तरावरून पीकपेरणी अहवाल त्याच वेळेत अगदी वस्तुस्थिती दर्शवणार असावा यासाठी शासनाच्या वतीने आता मोबाईल अ‍ॅपद्वारे त्याची नोंदणी केली जाणार आहे. शेतकरीच त्यात पीकपेर्‍याची माहिती नोंदवणार असल्याने आता शासनाला पिकांच्या एकूण स्थितीची अगदी सत्य माहिती त्याद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई देतानाही मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. राज्यातील सहा तालुक्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

पीकपेरणीचा अहवाल वेळेत संकलित व्हावा, त्यात पादर्शकता यावी, पीक अहवालात शेतकर्‍यांचा सक्रिय सहभाग असावा, कृषी पतपुरवठा करताना सुलभ व्हावे, पीक पाहणी आणि पीकविमा दावे निकाली निघण्यास मदत व्हावी शिवाय यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील योग्य पद्धतीने देता यावी यासाठी शासनाने ऑनलाईन पीकपेरणीची संकल्पना अस्तित्वात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्याअंतर्गत गाव नंबर अर्थात 7-12 उतार्‍यावरील माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. ती शेतकरीच नोंदवणार असून टाटा ट्रस्टच्या वतीने त्यासाठीचे फार्मर फ्रेंडली अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकरी आपल्या पिकाची झालेली पेरणी आणि इतर माहिती नोंदवू शकेल. शासकीय यंत्रणांच्या वतीने त्याची खात्रीही केली जाणार आहे.

राज्यातील नागपूरमधील कामठी, अमरातवतीमधील अचलपूर, औरंगाबादमधील फुलंब्री, नाशिकमधील दिंडोरी, पुण्यातील बारामती आणि पालघरमधील वाडा या सहा तालुक्यांत हा पथदर्शी प्रकल्प लागू करण्यात आला आहे. त्याचा अनुभव आणि अहवालानंतर संपूर्ण राज्यात तो लागू केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*