त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उदघाटन

0

वेळुंजे(त्र्यं) : तरुणांच्या अवस्थेवर देशाची भिस्त अवलंबून आहे, देशाप्रती निष्ठा राखण्यासाठी आधी युवकांनी आपल्याकडून कुटुंबाच्या, राष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यावे. विचारशक्ती, कार्यशक्ती वाढवावी. उत्तुंग स्वप्ने पहावीत, तीही मराठीतून पहावीत ,जोपर्यंत मराठीतून स्वप्ने पडतील तोपर्यंत मराठीला मरण नाही, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ अब्दुल कलाम यांनी अगदी लहान वयात स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्ण केली. मोठे ध्येय निश्चित करा, आई वडिलांना आनंद होईल असे प्रयत्न करा, सकारात्मक व्हा म्हणजे जीवनाचे प्रश्न लवकर सुटतील, आपल्यात जे चांगले आहे ते विकसित करा, समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करा ,ते लेखनात येउ द्या, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे कळकळीचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ दिलीप पवार यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वाङ्मय मंडळाच्या उदघाटन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ दिलीप पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे ह्या होत्या, तर उदघाटक म्हणून अभ्यास मंडळ सदस्य व हरसूल महाविद्यालयाचे प्रा डॉ प्रकाश शेवाळे ,दुसरे अतिथीअभ्यास मंडळ सदस्य व क्रान्तिविर व्ही एन नाईक महाविद्यालयाचे प्रा डॉ राजेंद्र सांगळे,कार्यक्रमाचे संयोजक प्रा माधव खालकर,डॉ छाया शिंदे , प्रा समाधान गांगुर्डे, प्रा विनायक पवारआदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते भित्तीपत्रकाचेही उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यानी श्रेष्ठ होण्यासाठी नवनवीन प्रेरणा घ्याव्यात, प्रयत्नात सातत्य ठेवावे, चांगल्या कामांचे अनुकरण करावे, आयुष्याच्या कोऱ्या पानावर काही चांगले लिहा ज्याचा इतरांना आदर्श घेता येईल, सर्व उपक्रमांचा आंनद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

*