Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मुख्य बातम्या

अनावश्यक फोन कॉल्स, मेसेजपासून सुटका! ‘ट्राय डीएनडी’ अ‍ॅप

Share

नाशिक । भारत पगारे
दिवसातून चार ते पाच वेळा येणारे अनावश्यक मोबाइल कॉल्स, विविध कंपन्यांच्या एसएमएसपासून सुटका मिळत नसेल तर मोबाइलधारकांना आता थेट केंद्र सरकारच्या ‘ट्राय’ अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे.

त्यासाठी ’ट्राय’ने खास अ‍ॅप तयार केले असून ते आता कार्यान्वित झाले आहे.‘ट्राय डीएनडी’ या नावाने हे अ‍ॅप असून ते गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोडही करता येते. आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले हे अ‍ॅप ट्रायने सर्वसामान्य मोबाइलधारकांसाठी सुरू केले आहे. मोबाईल धारकाला एखाद्या कंपनीकडून व्हॉइस कॉल आल्यास किंवा एसएमएस आल्यास या अ‍ॅपमध्ये जाऊन संबंधित क्रमांक अ‍ॅपच्या माध्यमातून ‘ट्राय’ला आणि सेवा देणार्‍या कंपनीला ‘रिपोर्ट’ करावा लागेल.

मोबाइल वापरकर्त्याने संबंधित कॉल किंवा एमएसएसबद्दल तक्रार दिल्यानंतर ग्राहकाला त्यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे बंधन मोबाइल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांवर घालण्यात आले आहे. मात्र ही तक्रार नोंदविण्यापूर्वी संबंधित मोबाइलधारकाला आपला क्रमांक आधी ‘डीएनडी’ सेवेसाठी नोंदणीकृत करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाइल कंपनीला दोन आठवड्यांची मुदत द्यावी लागेल. दोन आठवड्यात संबंधित कंपनीला ‘डीएनडी’ची मागणी करणार्‍या ग्राहकाचा क्रमांक टेलिमार्केटिंग यादीतून काढावा लागेल.

त्यानंतरही ग्राहाकाला टेलिमार्केटिंग कॉल किंवा एसएमएस आल्यास ट्रायकडून दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. अनेक वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करताना संबंधित कंपन्या ग्राहकांकडून ‘डीएनडी’बद्दल ना-हरकत अर्जावर क्लिक करून घेतले जाते. तसे केले नाही तर वेबसाइट किंवा अ‍ॅप सुरूच होत नाही. त्यामुळे ग्राहकाचा क्रमांक डीएनडीच्या यादीत असतानाही त्याला संबंधित कंपनीकडून टेलिमार्केटिंग कॉल्स येतात.

दररोज 30 हजार मेसेज
देशभरातील ग्राहकांना दररोज सुमारे 30 ते 35 हजारांवर एसएमएस आणि त्याच प्रमाणात टेलिमार्केटिंग कॉल्स पाठविले जातात. यामुळे ग्राहक त्रासले जातात. त्यामुळे ट्रायने ग्राहकांच्या सुविधेसाठी डीएनडी हा उपाय शोधून काढला आहे. मात्र त्यातूनही अनेक कंपन्यांनी पळवाटा शोधल्याने मोबाइलधारकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

असे करा अ‍ॅप डाऊनलोड
अँड्रॉइड फोनवरून गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर ट्राय डीएनडी हे नाव सर्च करावे, त्यानंतर डाऊनलोड करून घ्यावे. यानंतर इन्स्टॉल करावे. मोबाईल स्क्रीनवर आलेल्या सुचनांचे पालन करून आपला मोबाईल नंबर समाविष्ट करावा.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!